अहिल्यानगर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांच्या विकासासाठी २०७ कोटी रुपये तर कुकडीचे पाणी सीना नदीमध्ये आणून १५० कोटी रुपयांच्या बुडीत बंधाऱ्याद्वारे अहिल्यादेवींच्या स्मारक परिसरात पोहोचवले जाणार असल्याची माहिती विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे जन्मगाव चौंडी (ता. जामखेड) येथे आयोजित पालखी सोहळा व अभिवादन कार्यक्रमात सभापती शिंदे बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, श्रीराम पुंडे, सुनील वाघ, चिमणभाऊ डांगे, नानासाहेब कोपनर, अभिमन्यू सोनवणे, अविनाश शिंदे, पांडुरंग उबाळे, तेजस देवकाते आदी उपस्थित होते.
आदर्श राज्य कारभाराचे उदाहरण निर्माण करणाऱ्या अहिल्यादेवी यांच्या संघर्षमय जीवनातून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी, असे आवाहन करून शिंदे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांचे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या धर्तीवर भव्य राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी इच्छा होती. चौंडी येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत ६८१ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. या निधीतून राष्ट्रीय स्मारक, अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची सचित्र माहिती देणारी विकासकामे करण्यात येणार आहेत. येत्या तीन वर्षांची कामे पूर्ण केली जातील.
चौंडी येथे सूतगिरणी उभारणीसाठी ११८ कोटी रुपयांचा नीधी मंजूर असून पुढील वर्षी हे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष गिरणी सुरू होईल. अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीसाठी राज्य सरकारने मान्यता दिली असून, बहुभाषिक चित्रपटाच्या निर्मितीसाठी २१ कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे.
चौंडीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांचा विकास २०७ कोटी रुपयांतून करण्यात येणार असून, वर्षभरात रस्त्यांची कामे पूर्ण होतील. कुकडीचे पाणी सीना नदीमध्ये आणून १५० कोटी रुपयांच्या बुडीत बंधाऱ्याद्वारे स्मारकाच्या परिसरात पाणी पोहोचवण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव १६ महिन्यातच बदलण्यात यश मिळाले. आता त्यांच्याच नावाने अहिल्यानगर येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही राम शिंदे यांनी सांगितले.
आपल्या मंत्रिपदाच्या काळात १०० कोटी रुपयांत कृषी महाविद्यालय सुरू केले. अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासनामार्फत साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. इतिहास आपल्याला मार्गदर्शन करतो, त्यातून प्रेरणा घेऊन अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य पुढील नेण्यास बळ यानिमित्ताने मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, नानासाहेब कोपनर आदींची भाषणे झाली.