Ramdas Kadam Reply to Anil Parab : शिवसेनेच्या (शिंदे) दसरा मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत काही विधाने केली. यानंतर त्याला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आणि काही गंभीर दावे केले होते. यानंतर दोन्ही पक्षात शाब्दिक युद्ध छेडले गेले आहे. यापार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत अनिल परब यांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.
बिल्डरकडून दोन मर्सिडीज घेतल्या
रामदास कदम अनिल परब यांच्यावर आरोप करताना म्हणाले की, विले पार्ले प्रेम नगर एसआयएलसी (झोपडपट्टी पुनर्वसन) योजना चालू आहे. अनिल परब यांनी ८ हजार मराठी माणसांना शाखेत बसवून, दम देऊन तुम्ही तुमची घरं खाली करून घ्या. मी तु्म्हा सगळ्यांना फ्लॅट देईन, असं आश्वासन संजय कदम आणि अनिल परब यांनी दिलं. या आठ हजार लोकांना तेथून खाली केलं. फक्त एक वर्षाचं भाडं दिलं. त्यानंतर ९ वर्षे ही मराठी माणसं मुंबईच्या बाहेर आहेत, असे रामदास कदम म्हणाले.
यावेळी रामदास कदमांनी तेथील रहिवाशांनी दिलेलं प्रतिज्ञापत्र माध्यमांसमोर वाचून दाखवले. त्यामध्ये म्हटलं आहे की, संजय कदम आणि अनिल परब यांनी प्रेम नगरच्या प्रोजेक्टमधून कोट्यवधी रुपये कमावले, मी व माझ्यासारखे अनेक लोक देशोधडीला लागले. आमचा बिल्डर, सहारा ग्रुपचा मालक सुधाकर शेट्टी याने अनिल परब यांना दोन मर्सिडीज दिल्या आहेत. संजय कदम यांनी बिल्डरच्या पैशांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना बुलेट बाईक वाटल्या. वरील सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. हे माझं म्हणणं नाही, तेथील रहिवाशांनी प्रतिज्ञापत्र दिलं आहे. अशी अनिल परब यांची अनेक प्रतिज्ञापत्र माझ्याकडे आहेत, असेही रामदास कदम म्हणाले.
मग प्रेस बुलेटिन का काढले नाही?
बाळासाहेबांसोबत डॉक्टरांची टीम होती, असा मुद्दा अनिल परब यांनी मांडला आणि बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टर आणि आम्ही सगळे नेते जनतेसमोर गेलो असे ते म्हणाले. हे धादांत खोटं, चूक आहे. अनिल परब खोटं बोलले. मी दाव्याने सांगतो, शेवटचे दोन दिवस बाळासाहेब ज्या खोलीत होते तेथे कोणालाही जाण्याचा अधिकार नव्हता. ते म्हणतात की असंख्य लोकं भेटत होते. हे चूक आहे. ते दलाली खावून बोलले आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली आहे. उद्धव ठाकरेंना खुष करण्यासाठी हे बोलले आहेत, जनतेसमोर फक्त मी एकटा गेलो होतो, तेव्हा बरोबर कोणीही डॉक्टर नव्हते. हिंमत असेल तर डॉक्टरांची नावे सांगा. ते होते का याची चौकशी होईल. त्या डॉक्टरांनी प्रेस बुलेटिन का काढलं नाही? याचं उत्तर कोण देईल? असा सवालही रामदास कदम यांनी उपस्थित केला.
अनिल परब तुम्ही का बोलताय? उद्धव ठाकरे का बोलत नाहीत? उद्धव ठाकरेंचे बाप होते बाळासाहेब ठाकरे, बापाच्या बाबतीत कोणी शंका उपस्थित केली तर त्याचं निरसन मुलाने स्वतः केले पाहिजे. बिल्डरांकडून मर्सिडीज गाड्या घेणाऱ्याला तुम्ही खुलासा करायला सांगत आहात, असेही रामदास कदम पुढे बोलताना म्हणाले.
मंत्रीपद नामधारी, योगेश कदमांनी पाडण्याचा प्रयत्न
जवळपास १४ वर्षानंतर रामदास कदमांना कंठ फुटला, मंत्रीपद घेतलं तेव्हा रामदास कदम का बोलले नाहीत? यावर बोलताना रामदास कदम म्हणाले की, मला मंत्रिपद दिलं ते पर्यावरण खातं दिलं तेव्हा पर्यावरण हे खातंच नव्हतं. मला काहीतरी द्यायचं म्हणून ते खातं दिलं होतं. सुभाष देसाईंना, दिवाकर रावते यांनी त्यांचं महामंडळ दिलं. मी जेव्हा मागायला मुख्यमंत्र्यांकडे गेलो, तेव्हा मी चिडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मला आतमध्ये घेतलं. मला म्हटले रामदासभाई मला उद्धवजींनी सांगितलं आहे की रामदासभाईंना महामंडळ द्यायचं नाही. मग जेव्हा मी उद्धव ठाकरेंकडे गेलो की, देवेंद्र फडणवीस तुमचं नाव सांगत आहेत. तेव्हा ते म्हणाले, हो तुम्हाला ते मिळणार नाही. मला फक्त नामधारी, लोकं हसतील म्हणून ते दिलं होतं, असे रामदास कदम म्हणाले.
माझ्या मुलाला देखील तिकीट दिलं जात नव्हतं, राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांना तीन वेळा मातेश्रीवर आणून बसवले होते. शेवटी मी शेवटचं हत्यार काढलं, त्यानंतर जबरदस्तीने योगेशला तिकीट दिलं आणि तिकीट देऊन त्यांला पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप रामदास कदम यांनी केला.
मी आरोप केले नाहीत – रामदास कदम
रामदास कदम यांनी खोटे आरोप केलेत या अनिल परबांच्या विधानावरही कदम यांनी भाष्य केले. ते म्हणाले, मी आरोप केले नाहीत, मी संशय व्यक्त केला आहे आणि आता मीच तुमच्याविरोधात कोर्टात जात आहे. पहिल्यांदा अनिल परब यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. प्रेम नगरच्या एसआरएच्या योजनेत मर्सिडीज घेतल्या की नाही? अख्ख्या मंत्रिमंडळात फक्त योगेश कदमच्याच फाईल सापडतात का? मी संशय निर्माण केला आहे. उद्धव ठाकरेंच्या ऐवजी हे येऊन खोटे का बोलत आहेत? यासाठी अनिल परब यांची नार्को टेस्ट केली पाहिजे, असे रामदास कदम म्हणाले.
ठसे घेऊन काय उपयोग?
त्यांनी म्हटलं की मेलेल्या माणसांचे ठसे घेऊन त्याचा उपयोग काय असतो? तो तुम्हाला माहिती, मी कसं सांगू. मी पुन्हा शपथेवर सांगतो. जेव्हा उद्धव ठाकरेंना मी म्हटलं की आपण साहेबांच्या पायांचे ठसे घेऊन ठेवायला पाहिजेत, ते आम्हाला पुज्यनीय आहेत, तेव्हा रामदासभाई मी त्यांच्या हताचे ठसे घेऊन ठेवलेत, हे उद्धव ठाकरेंचे शब्द आहेत. म्हणून आमच्या दोघांची नार्को टेस्ट व्हावी असे म्हणालो. तुम्ही तिथे नव्हतात, त्यावेळेला मातोश्रीमध्ये मी आणि उद्धव ठाकरे दोघेच होतो. त्यामुळे मी म्हणालो दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, असे रामदास कमद म्हणाले.
पुतण्याने आत्महत्या केली नाही
त्यांनी माझ्या पुतण्याचा उल्लेख केला, की त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली. माझ्या मोठ्या भावाचा मुलगा अनिल परब यांच्याविरोधात कोर्टात जातोय. आमच्या कुटुंबात कोणीही आत्महत्या केलेली नाही. माझ्या पुतण्याने आत्महत्या केली नाही. पहाटे पाच वाजता धुक्यामध्ये त्याची मोटर सायकल आणि समोर आलेली गाडी यांची टक्कर झाली. सहा महिने कोल्हापूरच्या रुग्णालयात होता आणि एक वर्ष जगला. त्याला आम्ही घरी आणलं. त्यानंतर त्याचं निधन झालं. आत्महत्या झालेली नसताना आम्हाला बदनाम करण्याचं पाप केलं जात आहे, असे रामदास कदम म्हणाले.
बोगस कंपन्या काढून कर चुकवला
बोगस कंपन्या काढायच्या आणि त्या तोट्यात गेल्या असे दाखवून कर चुकवायचा असे काम केल्याचा आरोप रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर केला आहे. अनिल परब यांचे वडील आणि मुलीच्या नावाने बोगस कंपन्या असल्याचे रामदास कदम म्हणाले. याची चौकशी करण्याबाबत मी सरकारला पत्र देत आहे, असे रामदास कदम यांनी सांगितले.