रत्नागिरी : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या‘ च्या जयघोषात लाडक्या गणेशाला निरोप दिल्यावर आता मुंबईवासी कोकणकर परतीच्या प्रवासाला लागले आहेत. परतीच्या प्रवासात जिल्ह्यात रेल्वे व बस स्थानके गर्दीने हाऊस फुल्ल झाली आहेत. मात्र उशिरा सुटणा-या गाड्यांमुळे कोकणकरांचा चांगलाच खोळंबा होत आहे.रत्नागिरी जिल्हाभरातील गणेश भक्तांनी मोठ्या भक्ती भावाने दहा दिवसाच्या आपल्या लाडक्या गणेशाला निरोप दिला. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागातही अनंत चतुर्दशीचा उत्साह गणेश भक्तांमध्ये ओसंडून वाहत होता.
रत्नागिरी जिल्ह्यातील शनिवारी ३६४०५ घरगुती आणि ६१ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.विविध भागांतून गणेश मंडळांच्या मिरवणुका दुपारनंतर वाजत-गाजत सायंकाळी उशिरा गणेश घाटा पर्यत पोहचल्या. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया‘चा जयघोष करत मिरवणुकांमध्ये तरुणाई उत्साहात नाचत होती. गावागावात तर घरगुती गणपती विसर्जनासाठी अनेक कुटुंबांनी एकत्रितपणे मिरवणुका काढल्या. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळेच या आनंद सोहळ्यात सहभागी झाले होते.
रत्नागिरी शहर व परिसरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यत गणेश मंडळे व घरगुती गणपतींच्या विसर्जन मिरवणूका सुरू होत्या. त्यावेळी नगर परिषदेचे कर्मचारी, तसेच जीवरक्षक, सुरक्षारक्षक देखील तैनात करण्यात आले होते. दुपारनंतर गणेशमंडळांच्या मिरवणूका विसर्जन मार्गावर येण्यास सुरूवात झाली होती. गणेश विसर्जना नंतर कोकणकर मुंबईकडे परतीच्या प्रवासासाठी निघाले आहेत. शनिवार रात्री पासून मुंबईकरांनी रेल्वे व बस स्थानके फुल्ल झाली आहेत.
रविवारी सकाळ पासून या गर्दीत आणखी वाढ झाल्याने सर्व जिल्ह्यातील रेल्वे व बस स्थानके गजबजून गेली आहेत. कोकणात आलेल्या गणेश भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने गणपती स्पेशल गाड्यांची सोय केली आहे. मात्र कोकण रेल्वे मार्गावर सर्वच गाड्या दोन ते तीन तास उशिराने धावत असल्याने याचा फटका गणेश भक्तांना बसू लागला आहे. एसटी बस व रेल्वे कोकणातून गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणावर भरुन जात असल्याने चित्र पहावयास मिळत आहे.