रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावरील राजापुर तालुक्यातील पन्हळे माळवाडी येथे बर्निंग टँकरचा थरार पहावयास मिळाला. भर पावसात धावणा-या केमिकल टँकरचे मागील टायर पेटल्याने टँकरला भीषण आग लागली. शनिवारी सकाळी ९ वाजता ही घटना घडल्याने महामार्गावरील वाहतुक एकेरी मार्गावरुन सुरु करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गोवा येथून मुंबईच्या दिशेने जाणारा केमीकल भरलेला टँकर राजापुरातील पन्हळे माळवाडी येथे आला असता मागील चाकांनी अचानक पेट घेतला. टँकरचा मागील भाग पुर्ण पेटल्याने हवेत धूराचे लोट पसरले. ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास येताच गोव्याहुन मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतुक थांबवण्यात आली. ती वहातूक दुसऱ्या एकेरी मार्गावरुन वळविण्यात आली. याआगीत टँकरचे मोठे आर्थिक नुकसान झाले तर कोणतीही जिवित हानी झाली नाही.
या टँकरला आग लागून एक तासापेक्षा जास्त काळ उलटला तरी ही आग अटोक्यात आणण्यासाठी तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापण यंत्रणेने कोणतीच हालचाल केली नाही. पोलीस यंत्रणाही घटनास्थळी उशिरा दाखल झाली.