हर्षद कशाळकर

अलिबाग- रायगड जिल्ह्यातील तीनही आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या समवेत बंडखोरी केली आहे. मात्र ही बंडखोरी करताना त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे आगामी काळात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन समजूत काढण्याचे मोठं आव्हान बंडखोर आमदारांसमोर असणार आहे.

  महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. मात्र सहभागी होताना त्यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे पदाधिकारम्ी आणि कार्यकर्ते काहीसे नाराज आहेत. आमदारांच्या धक्कातंत्रामुळे सारे जणच अचंबित झाले आहेत.

     पक्षनेतृत्वाबाबत रायगड जिल्ह्यातील शिवसेना संघटनेत नाराजी होतीच. ही नाराजी वेळोवेळी समोरही आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्यात पक्षसंघटनेची गळचेपी होत असल्याची तक्रार आमदारांसह कार्यकर्ते आणि पदाधिकारी करत होते. मात्र अडीच वर्षांत उध्दव ठाकरे यांच्याकडून त्याची फारशी दखल घेतली गेली नव्हती.

दोन्ही पक्षात समन्वय राहावा यासाठी मुंबईत एक दोन बैठकांचे सोपस्कार पार पडले होते. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे पक्षांतर्गत धुसफूस सुरूच होती. पण यातून तीनही आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून टोकाचा निर्णय घेतील असे कोणालाच वाटले नव्हते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये काहीशी नाराजी आहे. त्यांची समजूत काढण्याचे मोठे आव्हान आता तीनही आमदारांसमोर असणार आहे.

    आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार महेंद्र दळवी यांना निरनिराळय़ा पक्षात काम करण्याचा अनुभव आहे. दळवींची वाटचाल शेकापतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत अशी झाली आहे. तर महेंद्र थोरवे हे शेकापतून शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे दोघांच्याही पक्षनिष्ठा परिस्थितीनुसार बदलत राहिल्या आहेत. पण आमदार भरत गोगावले हे कायमच कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले गेले आहेत. त्यांनी कधीही पक्ष बदललेला नाही. जिल्हा परिषदेपासून आमदारकीपर्यंत शिवसेनेत राहूनच त्यांची वाटचाल झाली आहे, त्यामुळे त्यांचे बंड हा शिवसैनिकांसाठी मोठाच धक्का असणार आहे.

     मुळात महाविकास आघाडी स्थापनेचा निर्णयच पक्षातील अनेकांना रुचला नव्हता. त्यांनी ही नाराजी वेळोवेळी बोलूनही दाखवली होती. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप संघटना दुखावणार नाही असे प्रयत्न शिवसेना आमदार आणि पदाधिकारी सातत्याने करत होते. किरीट सोमय्या यांच्याकडून रश्मी उध्दव ठाकरे यांच्या कोर्लई येथील जागेवरून आणि संजय राऊत यांच्यावर किहीम येथील जागांवरून आरोपांची झडी बरसत असतानाही.

शिवसैनिकांनी संयम राखला होता. जिल्ह्यातील भाजप संघटना दुखावणार नाही याची खबरदारी घेतली होती. त्यामुळे राज्यपातळीवर दोन्ही पक्ष दुरावल्याचे दिसत असले तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांनी परस्पर सहकार्य कायम राखले होते. माणगाव नगर पंचायत निवणुकीत याचाच प्रत्यय आला होता.