सातारा : सातारा जिल्ह्याचे निवृत्त अग्रणी बँक अधिकारी, अर्थविषयक अभ्यासक आणि साहित्यप्रेमींतर्फे श्रीराम नानल यांना नामदेव महाराज हरड यांच्या हस्ते सातारा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नानासाहेब निकम, उपाध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने, खजिनदार संजय यादव, शिवकृपा पतपेढीचे अध्यक्ष गोरखनाथ चव्हाण, महेश पवार, प्रकाश निपाणे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. नवी मुंबई, ठाणे तसेच जुन्या गिरणगावातील सातारकर मंडळींनी स्थापन केलेल्या ‘आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान’तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.

नानल यांनी जिल्ह्यात अग्रणी बँकेच्या मार्फत जिल्ह्यात बचतगट चळवळ उभी केली. २०१२ मध्ये निवृत्तीनंतरही त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी एम रामास्वामी यांच्या सूचनेनुसार जिल्ह्याचा पायाभूत सुविधांचा विशेष आराखडा तयार करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. ऑगस्ट २०१४ नंतर सातारा जिल्ह्यासाठी महाराष्ट्र बँकेसाठी जनधन योजनेचे सल्लागार या नात्याने एका वर्षात ६० हजार नवीन बचत खाती उघडून घेतली.

राष्ट्रीय जीवन उन्नती अभियान या अंतर्गत मुख्य प्रशिक्षक या नात्याने सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केले. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी पुस्तके गोळा करून जिल्ह्यातील २३ वाचनालयांना सुमारे तीन हजार पुस्तके त्यांनी भेट देण्यात महत्त्वाचे योगदान दिले.

या वेळी श्री. नानल यांनी पुरस्काराबद्दल आभार व्यक्त करताना घरच्या मंडळींनी तो दिल्यामुळे हुरूप वाढल्याचे सांगितले. नानासाहेब निकम यांनी सातारकरांनी प्रतिष्ठानचे सभासद व्हावे, असे आवाहन या वेळी केले.