सावंतवाडी: सेवानिवृत्त इन्कम टॅक्स अधिकाऱ्याला दोघा भामट्यांनी लक्ष करत ईडीचा धाक दाखवून फसवणूक करण्याचा प्रकार केला. या दरम्यान १२ लाख ७६ हजार ६१८ रूपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सावंतवाडी तालुक्यातील तांबोळी खालचीवाडी येथील सेवानिवृत्त इन्कम टॅक्स अधिकारी बळीराम परब यांना फेक कॉलद्वारे ईडीची धमकी देऊन १२लाख ७६ हजार ६१८ रूपये लाटल्या प्रकरणी बांदा पोलिसात तक्रार दिली, त्यानुसार संशयित ईशांत शर्मा (रा. टेलिकम्युनिकेशन हेड ऑफिस अंधेरी मुंबई ) आणि संजय पिसे( रा. नाशिक पंचवटी ) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर फसवणूक २७ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान झाली आहे.

तांबोळी येथील बळीराम परब मुंबई इन्कम टॅक्स अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.सध्या ते तांबोळी या आपल्या गावी राहतात.२७ फेब्रुवारीला त्यांना एक कॉल आला. समोरील व्यक्तीने तुम्हाला अटक करण्यात येणार आहे असे सांगितले. यामुळे श्री.परब घाबरून गेले.या भामट्याने सांगितल्याप्रमाणे त्यांनी तीन विविध बँकेत व गुगल प्ले द्वारे १२ लाख ७६ हजार ६१८ रुपये भरले. यानंतर आणखी चार लाख रुपये भरण्यासाठी दोघे भामटे  कॉल करून सतावत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान श्री.परब यांनी कार्यालयात चौकशी केली असता त्यांच्या कार्यालयात असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे समोर आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची त्यांना खात्री झाली त्यांनी बांदा पोलिसात  फसवणूक झाल्याची माहिती दिली. सायबर क्राईम आणि बांदा पोलिसात तक्रार  दिल्यानंतर पोलिसांनी दोघा भामट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.