अलिबाग : मागील ४ ते ५ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रायगड जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे भातपिकाची कापणी लांबणीवर पडणार आहे. साधारण दसऱ्यानंतर कोकणात भातपिकाच्या कापणीला सुरुवात होते. सध्या हळव्या भातपिकामध्ये दाणे भरले असून ही पिके कापणीच्या अवस्थेत आहेत. मात्र पावसामुळे आता कापणी लांबणीवर पडणार आहे. काही ठिकाणी भातशेती आडवी झाल्याने रायगडमधील शेतकरी चिंतातुर झाला आहे.   सध्या हळव्या भातपिकांमध्ये दाणे भरले असून भातपीक कापणीच्या अवस्थेत आहे. साधारण दसऱ्यानंतर कोकणात भात कापणीला सुरुवात होते. पुढील दोन  दिवसांत कापणीचा हंगाम सुरू होईल. असे असताना आज पहाटेपासूनच जिल्ह्याच्या सर्वच भागांत कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसतो आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

पावसाचा जोर वाढल्यास या पिकाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, मात्र गरव्या म्हणजे उशिरा येणाऱ्या भाताला हा पाऊस पोषक ठरू शकतो. रायगड जिल्ह्यात यंदा एक लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली आहे. कमी-अधिक झालेल्या पावसाने सप्टेंबर महिन्यात सरासरी गाठली. यंदा फारशी अतिवृष्टी न झाल्याने पुरामुळे होणारे नुकसान टळले आहे. त्यामुळे यंदा पीक दमदार आल्याने शेतकरी वर्ग खुशीत आहे. असे असतानाच पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. हस्त नक्षत्रात पडणारा पाऊस शेतीला धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अद्याप परतीचा पाऊस सुरू झाला नाही. परतीचा पाऊस दरवर्षी त्रासदायक ठरतो. सध्या पुढचे काही दिवस जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात पाऊस लांबण्याची शक्यता आहे. आम्ही पुढच्या दोन दिवसांत कापणीला सुरुवात करणार होतो, पण हा पाऊस पुन्हा सुरू झालाय. त्यामुळे कापणी कशी करायची हा प्रश्न आहे. पाऊस लांबला तर उभे पीक आडवे होऊन नुकसान होण्याची भीती आहे. आम्ही आता पाऊस थांबण्याची वाट पाहतोय.