जुलै महिन्यात अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजपा आणि शिंदे सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पण, अजित पवार गटातील आमदारांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार गटातील आमदारांविरोधात भाजपा अपक्ष उमेदवार उभे करणार आहे, असं रोहित पवारांनी म्हटलं. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
रोहित पवार म्हणाले, “अजित पवार गटातील आमदारांना भीती वाटत आहे. कारण, येत्या काळात अजित पवार गटातील आमदारांविरोधात भाजपा अपक्ष उमेदवार उभे करणार आहे. त्या अपक्ष उमेदवारांना भाजपा ताकद देत अजित पवार गटातील आमदारांना पराभूत करण्याचं काम करणार आहे. ही गोष्ट माहिती असल्यानं अजित पवार गटातील आमदारांमध्ये चल-बिचल सुरू झाली आहे.”
हेही वाचा : जयंत पाटील गटाचे नेते, कार्यकर्त्यांना अजितदादांचे आकर्षण
“…त्यामुळे अजित पवारांची कोंडी झाली आहे”
आमदार नवाब मलिक यांच्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिण्यात आलेल्या पत्राबाबतही रोहित पवारांनी भाष्य केलं आहे. “देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेलं खाजगी पत्र माध्यमांकडे आलं. मात्र, फडणवीसांना ते पत्र बाहेर आणायचेच होते. त्या पत्रामुळे अजित पवारांची कोंडी झाली आहे.”
हेही वाचा : पक्षश्रेष्ठींच्या नाराजीमुळे भाजप नेत्यांचे नवाब मलिकांबाबत मौन
“…म्हणून मराठा-ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातोय”
रोहित पवारांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली आहे. “छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलत आहेत. जानेवारी महिन्यात राजकारण जातीवर जाण्याची भीती आम्हाला वाटत आहे. लोकसभा निवडणुकीआधी ओबीसी-मराठा वाद सुरु झाला आहे. हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, त्यातून राजकीय पोळी भाजता आली नाही, म्हणून मराठा-ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत आहे,” असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.