Rohit Pawar On Ajit Pawar Confession : कुटुंबातील फूट समाज स्वीकारत नाही. मलाही याचा अनुभव आहे, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोतील एका सभेत बोलताना केले होतं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनीही भाष्य केलं आहे.
रोहित पवार यांनी नुकताच टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.यादरम्यान, त्यांना अजित पवार यांच्या विधानाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, ज्या पक्षाने कुटुंब फोडलं त्यांना त्याचा जाब विचारण्याची हिंमत अजित पवारांमध्ये आहे का? अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
ज्या पक्षाने कुटुंब फोडलं त्यांना अजित पवार विचारणा करणार आहेत का? तुम्ही माझ्याकडून काय करून घेतलं, हे भाजपाला विचारण्याचं धाडस अजित पवारांमध्ये आहे का? मुळात लोकसभा निवडणुकीत लोकांनी अजित पवारांना नाकारलं आहे. त्यामुळे अजित पवार यांनी त्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी कंपनीला २०० कोटी रुपयांचे कंत्राट दिलं आहे. ती कंपनी लोकांच्या भावनांचा अभ्यास करते, त्यातून नेत्यांच्या तोंडून अशी विधानं येतात, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
“विकासाबरोबर विचार महत्त्वाचा, बारामतीकरांनी दाखवून दिलं”
दरम्यान, बारामतीत आपण सर्वांगीण विकास केला. सर्वाधिक निधी दिला. पण एवढी सगळी कामं करूनही बारामतीकर वेगळा निर्णय घेऊ शकतात, असा विचार कधीकधी मनात येतो, असं विधानही अजित पवार यांनी केलं होतं. याबाबत विचारलं असता, अजित पवार असं का बोलले, ते मला माहिती नाही. एक तर ते भावनिक झाले असावे किंवा त्यांनी लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला असावा, खरं तर विकास महत्त्वाचा आहे, तसाच विचारसुद्धा महत्त्वाचा आहे. बारामतीतल्या सुज्ञ आणि स्वाभिमानी मतदारांनी हे दाखवून दिलं आहे. विचार सोडल्यामुळे अजित पवार यांना तिथे नुकसान झालं, असं आपल्याला म्हणावं लागेल, असं रोहित पवार म्हणाले.