Rohit Pawar on Prem Birhade Job lost in UK : लंडनमध्ये नोकरी लागलेल्या प्रेम बिऱ्हाडे या तरुणाने पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयावर (जिथून त्याने पदवीचं शिक्षण घेतलं आहे) गंभीर आरोप केले आहेत. त्याने दावा केला आहे की “मला लंडनमधील एका कंपनीत नोकरी मिळाली होती. मात्र, त्या कंपनीने मी ज्या महाविद्यालयातून पदवी मिळवली आहे त्या महाविद्यालयाकडे पडताळणी प्रमाणपत्र मागितलं होतं जे महाविद्यालयाने दिलं नाही, त्यामुळे माझी नोकरी गेली. या लोकांना आम्ही दलितांनी पुढे गेलेलं बघवत नसल्यामुळेच त्यांनी माझं पडताळणी प्रमाणपत्र पुरवलं नाही.”

यावर मॉडर्न महाविद्यालयाने उत्तर दिलं आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे म्हणाल्या, “प्रेमवर्धन नरोत्तम बिऱ्हाडे हा विद्यार्थी २०२० ते २०२४ पर्यंत आमच्या महाविद्यालयात होता. हा विद्यार्थी आमच्या महाविद्यालयाची, कर्मचाऱ्यांची आणि प्राचार्यांची बदनामी करण्यासाठी सतत छळवणूक करत आहे, बदनामीकारक विधाने करत आहे आणि हेतुपुरस्सर सोशल मीडियाचा गैरवापर करत आहे. यापूर्वी या विद्यार्थ्याला तीनवेळा बोनाफाईड प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. तसेच आजही एकदा देत आहोत. महाविद्यालयात शिकत असताना त्याच्या असमाधानकारक वर्तणुकीचा आणि शिस्तभंगाचा रेकॉर्ड पाहूनही त्याला त्याची प्रमाणपत्र देण्यात आली आहेत.

दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांच्यावर मनुवादी असा ठपका ठेवत टीका केली आहे. रोहित पवार यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे.

रोहित पवारांचा प्रचार्यांवर गंभीर आरोप

रोहित पवार म्हणाले, “पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाने वेळेत कागदपत्रांची पडताळणी करून दिली नाही म्हणून एका युवा विद्यार्थ्याची लंडनमधील नोकरी जात असेल तर हे योग्य नाही. ज्या मानसिकतेतून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला त्याच मानसिकतेतून प्रेम बिऱ्हाडे या युवकाला छळण्याचा प्रयत्न मॉडर्न कॉलेज प्रशासन करत आहे का?”

“महाविद्यालयातील कर्मचारीवर्ग सहकार्य करणारा आहे यात कुठलीच शंका नाही, पण सर्व नियम कायदे, ज्येष्ठताक्रम डावलून प्राचार्य झालेल्या नव्या प्राचार्य मॅडम मनुवादी विचारांच्या आहेत यात देखील कुणाचं दुमत नाही. चांगला नावलौकिक आणि मोठा वारसा असलेल्या महाविद्यालयात असले मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही. महाविद्यालयाने त्या युवा विद्यार्थ्याला आवश्यक सहकार्य करून दिलगिरी व्यक्त करावी, तसेच भविष्यात अशा चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि हे मनुवादी राजकारण थांबवावे, अन्यथा कॉलेज प्रशासनाला हे परवडणार नाही.”

महाविद्यालयाचं स्पष्टीकरण

दरम्यान, महाविद्यालयाने स्पष्ट केलं आहे की “प्रेम बिऱ्हाडेची नोकरी गेलेली नाही. आम्ही त्याच्या कंपनीने मागितलेली सर्व कागदपत्रे पुरवली आहेत. कंपनीने त्याच्या पाच वर्षांच्या स्क्रीनिंगची माहिती मागवली होती. मात्र, तो आमच्याकडे केवळ तीन वर्षे शिकत होता. त्यामुळे आम्ही तीन वर्षांचं स्क्रीनिंग पुरवलं आहे. तसेच आणखी दोन वर्षांची माहिती देण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे.”