Rupali Chakankar On Woman Doctor Dies By Suicide amid Rift with Cops : सातारा जिल्ह्यातील फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या मृत महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी स्वत:च्या तळहातावर सुसाइड नोट लिहिली होती.
यामध्ये तिने दोन जणांवर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. यापैकी एक जण पोलीस अधिकारी असल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून कारवाईचे आदेश दिले आहेत. यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देत ही घटना अत्यंत संतापजनक असल्याचं म्हटलं आहे. त्या टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होत्या.
रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?
“आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचं पथक रवाना झालेलं आहे. बीड आणि पुणे या भागात आरोपींचा तपास सुरू आहे. खरं तर अशी घटना घडणं हे अत्यंत संतापजनक आहे. राज्य महिला आयोग म्हणून आम्ही याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात दोन्हीही आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तसेच मी स्वत: या प्रकरणात सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या संपर्कात आहे”, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
“या महिला डॉक्टरने पोलिसाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि पोलिसाची देखील डॉक्टर महिलेच्या विरोधात तक्रार होती. आता आणखी सविस्तर माहिती आपल्याकडे येईल. पण या महिला डॉक्टरच्या विरोधात का तक्रार होती? याची देखील माहिती समोर येईल. एकमेकांच्या विरोधात तक्रार देण्याच्या पाठिमागचं कारण काय होतं? यांचही कारण समोर येईल. मात्र, अशा घटना घडू नये”, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पोलिस निरीक्षक गोपाल बदने यांनी केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाइड नोटमुळे समोर आले आहे. तसेच प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) October 24, 2025
“या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणत्या यत्रणांनी दुर्लक्ष केलं, त्यांच्यावर देखील कारवाई होण्यासाठी महिला आयोग पाठपुरावा करेल. या प्रकरणामध्ये ज्याच्यावर आरोप आहेत त्यापैकी एक पोलीस उपनिरीक्षक आहे आणि एक इंजिनिअर आहे. पोलीस उपनिरीक्षक आणि इंजिनिअर हे एकाच तालुक्यातील असल्याची माहिती समजते आहे. आता पोलीस तपासात अधिक माहिती समोर येईल”, असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे.
