सातारा : सासपडे येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी या प्रकरणाची सुनावणी जलदगती (फास्ट्रॅक) न्यायालयात केली जाणार आहे. राज्य महिला आयोगामार्फत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी शिफारस करणार असल्याचे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सासपडे येथे जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. या वेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी उपस्थित होते.

चाकणकर यांनी मुलीच्या कुटुंबीयांची त्यांच्या गावात जाऊन भेट घेतली. या वेळी मुलीच्या आईला अश्रू अनावर झाले. त्यामुळे परिसरातील वातावरण गंभीर झाले. चाकणकर यांनी त्यांच्या मुलीला न्याय मिळवून देण्याबाबत कुटुंबीयांना आश्वस्त केले व तसे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना दिले.

मुलीच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, असे सांगून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर म्हणाल्या, ‘मनोधैर्य योजनेतून कुटुंबाला तातडीने मदत करावी. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतूनही कुटुंबाला मदत मिळवून देण्यात येईल. राज्य महिला आयोग आपल्या पाठीशी असून, न्यायालयात जास्तीत जास्त पुरावे सादर करून आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील.

सासपडेसारखी घटना सातारा जिल्ह्यात पुन्हा घडू नये, यासाठी बाललैंगिक अत्याचाराचे (पोक्सो) गुन्हे दाखल असलेले जे गुन्हेगार जामिनावर बाहेर आहेत ते सध्या काय करीत आहेत, याची तपासणी करून काही गैरवर्तन करीत असल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, असा आदेश चाकणकर यांनी पोलीस विभागाला दिले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या उपनेत्या छाया शिंदे यांनी सासपडे प्रकरणातील पीडितेला तत्काळ न्याय द्यावा व नराधमावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे केली व निवेदन दिले.
मागील आठवड्यात सासपडे (ता. सातारा) येथे एका अल्पवयीन मुलीचा खून झाला होता. या वेळी गावात तणावपूर्ण वातावरण होते. याप्रकरणी मुलीच्या घराशेजारील राहुल बबन यादव या युवकास पोलीसांनी अटक केली आहे.

न्यायालयाने त्याची परवानगी पोलीस कोठडीत केली आहे. मुलीच्या खुनामध्ये गावातीलच युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच जमावाने या युवकाच्या घरावर हल्ला केला होता. पोलीसांनी हस्तक्षेप केल्यामुळे या वेळी मोठा अनर्थ टाळला होता. या प्रकरणाची दखल घेऊन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात केली जाईल, संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे चाकणकर यांनी या वेळी सांगीतले.