संगमनेर : कीर्तनकाराच्या वक्तव्यातून सुरू झालेला वाद, त्यांना झालेली मारहाण, वाहनाची मोडतोड यातून संगमनेरमधील तणाव सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच होता. याप्रकरणी संबंधितावर कारवाईची मागणी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली असून, गुरुवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, दुसऱ्या गटाकडूनही याप्रकरणी आरोप-प्रत्योराप सुरू असून, समाजात खोटी माहिती पसरवणे आणि बदनामी करणाऱ्यावर कारवाईची मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली आहे. कीर्तनादरम्यान महाराजांच्या वक्तव्यावरून शनिवारी रात्री उद्भवलेल्या वादाचे पडसाद संगमनेरमध्ये उमटत आहेत. माजी मंत्री थोरात यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, की हरिनाम सप्ताह, कीर्तन अशा ठिकाणी सगळे मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे. एकमेकांविरोधात लढलेल्या दोन्ही उमेदवारांनी महाप्रसाद वाटला पाहिजे, असे आपले तत्त्व आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये कष्टाने बसवलेली संगमनेरची घडी जपण्यासाठी आपण कोणतीही किंमत द्यायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी महायुतीकडून संगमनेरमध्ये रास्ता रोको केले. आता महाविकास आघाडीकडून गुरुवारी (दि. २१) मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी दिली. या मोर्चामध्ये आघाडीतील पक्ष संघटना सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी महायुतीकडून संगमनेरमध्ये रास्ता रोको केले होते. या वेळी बोलताना आमदार खताळ हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना उद्देशून म्हणाले, की हिंदुत्वाचा प्रचार, प्रसार करणाऱ्या भंडारे महाराज यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतील, तर ते सहन केले जाणार नाही. धर्मसत्तेला भेदण्याचा प्रयत्न केला, तर हिंदुत्ववादी जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

आमदार खताळ यांच्या बदनामीची तक्रार

दरम्यान, संगमनेरमधील वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांची समाजमाध्यमातून काहींनी बदनामी केली असून, या व्यक्तीवर कारवाई करावी, अशी तक्रार राहुल भोईर यांनी पोलिसांत दिली आहे. आमदार खताळ यांच्या नावाचा गैरवापर करून त्यांची बदनामी करण्यासाठी खोटा आणि दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी या तक्रारीत केली आहे.