संगमनेर : नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेरमधील चंदनापुरी घाटात आज, गुरुवारी सकाळी संगमनेरहून साकुरच्या दिशेने निघालेली एसटी बस (एमएच ०७ सी ९२५२) उलटली गेली. या अपघातात बसमधील शालेय विद्यार्थ्यांसह १० ते १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने अपघातात कोणतीही प्राणहानी झाली नाही.
अपघाताबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेरहून साकुरकडे प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस चंदनापुरी घाटातून जात असताना धोकादायक वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्यावर उलटली गेली. अपघात होताच झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली. या बसमधून शालेय विद्यार्थ्यांसह अनेक प्रवासी प्रवास करत होते. मात्र, जीवितहानी टळल्याने अनर्थ टळला. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या १० ते १२ प्रवाशांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक वांबळे यांच्यासह डोळासने महामार्ग पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे महामार्गावर काहीकाळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.