सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ आज (सोमवारी) सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार असून जाहीर सभाही होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराज पाटील व शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दिली. यासाठी खासदार, आमदारांसह कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचेही सांगण्यात आले.

आमदार पडळकर यांनी जतमध्ये बोलताना आ. जयंत पाटील यांच्यावर टीका करताना घृणास्पद शब्द वापरले. याचा सार्वत्रिक निषेध होत आहे. अशा वाचाळवीरांना भाजपने रोखावे, त्यांचा आमदारकीचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. पुष्पराज चौकातून निघणाऱ्या मोर्चाचा मार्ग राममंदिर, पंचमुखी मारुती मंदिर, रिसाला रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कापड पेठ मार्गे स्टेशन चौकात येणार आहे. स्टेशन चौक येथे जाहीर सभा होणार आहे.

या निषेध आंदोलनासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह खासदार नीलेश लंके, खासदार धैर्यशील मोहिते, खासदार बजरंग सोनवणे, खासदार भास्कर भगरे, आमदार रोहित पवार, आमदार रोहित पाटील, आमदार अभिजित पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार राजू खेर आदींसह अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष श्री. बजाज म्हणाले, वाचाळवीरांना रोखण्यासाठी सुसंस्कृत राजकीय परंपरा टिकवण्यासाठी अशा प्रवृत्तीविरुध्द सर्वच राजकीय पक्ष आग्रही आहेत. अशा वाचाळवीरांना पाठीशी घालणाऱ्या भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी पुढे येऊन एकतर समर्थन करावे, अथवा कारवाई करावी अशी आमची मागणी असल्याचे सांगितले.

जतमधील तरुण अभियंता अवधूत वडार याचा मृत्यू संशयास्पद असून याबाबत चौकशी होऊन संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी केली तर त्यात चुकीचे काय असा सवाल यावेळी बजाज यांनी केला. शासनाने या घटनेची गांभीर्याने चौकशी करावी, अशीही आमची रास्त मागणी आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.