सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर सभेत करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेली भाजपची इशारा सभा दूरदृश्य प्रणाली पध्दतीने होणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी रविवारी सांगितले.

जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने स्टेशन चौकामध्ये महाराष्ट्र संस्कृती बचाव सभेचे आयोजन करून प्रत्युत्तर दिले. या जाहीर सभेत वाचाळवीरांना मुख्यमंत्री फडणवीस पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दि. १ ऑक्टोबर रोजी इशारा सभा घेणार असल्याचे सांगितले. रावण दहनच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत जातीयवादाला प्रत्युत्तर देण्यात येणार असून विरोधकांची भ्रष्टाचाराची प्रकरणे सभेत मांडणार असल्याचे जाहीर केले आहे.

विकृतीच्या रावणाचे दहन करण्यासाठी आणि संयमाला सभ्यतेने उजळविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने बुधवारी एक ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता घेण्यात येणारी इशारा सभा आता ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येणार आहे. पावसाचा जोर आणि राज्यातील पूरपरिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या आभासी सभेचा दुवा (ऑनलाइन सभेची लिंक) सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने संपूर्ण राज्यातील जनता ही सभा ऐकतील. या सांगलीतील नेमिनाथनगरमधील राजमती हॉलमध्ये होणाऱ्या सभेसाठी मर्यादित प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ढंग आणि महाडिक यांनी दिली.

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कुणी नासवली, कोणी स्वार्थासाठी जातीय मांडणी केली. कोणी इतरांच्या आया-बहिणी काढल्या आणि कोणाच्या जिभेने विषाची पेरणी केली याचे पितळ राज्यातील जनतेसमोर उघडे पाडण्यासाठी ही इशारा सभा घेण्यात येणार आहे. विरोधी पक्षाचा बुरखा या सभेमध्ये फाडण्यात येणार आहे. परंतु राज्यावर पडलेल्या आस्मानी संकटामुळे ओढावलेली पूरपरिस्थिती आणि पावसाचा वाढलेला जोर पाहून ही सभा सांगलीतील नेमिनाथनगरमधील राजमती हॉलमध्ये प्रमुख मर्यादित मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आता ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येणार आहे. तसेच ऑनलाइन सभा घेतल्याने वाचलेल्या मोठ्या सभेच्या खर्चाची रक्कम सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांना दिली जाणार आहे. तसेच या सभेनंतर त्याच ठिकाणी विकृतीच्या रावणाचे दहन करण्यात येणार आहे, असे महाडिक व ढंग यांनी रविवारी सांगितले.