सांगली : क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसासाठी एफआरपी’पेक्षा जादा दर देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अध्यक्ष शरद लाड यांनी दिली. दिवाळीसाठी उस उत्पादकांना प्रतिटन 50 रुपये या प्रमाणे शुक्रवारी सुमारे ५ कोटी रुपये बँकेतील खात्यावर वर्ग केले.

श्री. लाड यांनी सांगितले, कारखान्याचे संस्थापक आमदार अरूण लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला या कारखान्याने यंदाच्या वर्षी जिल्ह्यात सर्वाधिक ९ लाख ९१ हजार २९० टन ऊस गाळप केले आहे. कारखान्याची एफ.आर.पी. नुसार ३१८९ रुपये प्रती टन ऊस दर होत असून, कारखान्याने एफ. आर. पी. पेक्षा ६०.८५ रुपये ज्यादा देण्याचे धोरण घेतले असून, त्यापैकी रुपये ३२०० प्रती टन यापूर्वीच अदा केले आहेत. उर्वरित ५० रुपये दिवाळीनिमित्ताने ऊस उत्पादक यांना देण्यात येणार असल्याने ऊस उत्पादकांची यंदाची दिवाळी गोड होईल.

क्रांती कारखान्याने कायम उस उत्पादक शेतकर्‍यांचा विचार करून अत्याधुनिक ज्ञान शेतकर्‍यांच्या बांधावर देण्याचा प्रयत्न केला आहे. उत्पादन खर्चात कपात व्हावी यासाठी ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्याचे नियोजन केले आहे. तसेच उस रोपेही सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शेतकर्‍यांना उस उत्पादन वाढीसाठी अद्यावत ज्ञान बांधावर देण्याचा कारखान्याचा प्रयत्न असतो. याशिवाय उस उत्पादकांना यंदा एफआरपीपेक्षा अधिक दर देण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने केला आहे. शेतकरी हिताचा निर्णय संचालक मंडळ घेत असल्याने यंदाच्या हंगामात अधिकाधिक उस गाळपासाठी क्रांती कारखान्याला देतील असा विश्‍वास अध्यक्ष लाड यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील, संचालक वैभव पवार, सुकुमार पाटील, रामचंद्र देशमुख, अंजना सूर्यवंशी, अनिल पवार, दिलीप थोरबोले, जयप्रकाश साळुंखे, सतीश चौगुले, शीतल बिरनाळे, संजय पवार, प्रभाकर माळी, जितेंद्र पाटील, संग्राम जाधव, सुभाष वडेर, विजय पाटील, अशोक विभुते, बाळकृष्ण दिवाणजी व कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे उपस्थित होते.