सांगली : सांगली जिल्ह्याच्या सर्व क्षेत्राखालील कर्जवितरणाचे उदिष्ट १०६ टक्के गाठले असून २३ हजार १८७ कोटींचे कर्ज वितरण झाल्याची माहिती आढावा बैठकीत देण्यात आली.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीस बँक ऑफ इंडिया कोल्हापूर विभागाचे प्रबंधक पुनित द्विवेदी, रिझर्व बँकेचे अधिकारी राजेंद्र कानीशेट्टी, अग्रणी बँक व्यवस्थापक विडास वेताळ यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख, विविध विकास महामंडळांचे व्यवस्थापक, बँकांचे समन्वयक उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा वार्षिक पतपुरवठा योजनेचा २०२४-२५ अंतर्गत विविध बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला.
सांगली जिल्ह्याच्या सर्व क्षेत्राखालील लाक्षांकाच्या १०६ टक्के म्हणजेच रक्कम रूपये २३ हजार १८७ कोटी वाटप झाले आहे. त्यापैकी प्राथमिक क्षेत्रांसाठी रक्कम रूपये ११ हजार ४९५ कोटी तर अप्राथमिक क्षेत्रांसाठी रक्कम रूपये ११ हजार ६९३ कोटी वाटप झाले. यावेळी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत बँकांनी केलेल्या कर्जवाटपामुळे सांगली जिल्हा देशात तृतीय स्थानी आल्याबद्दल संबंधित विभागाचे अधिकारी व योगदान देणार्या बँक प्रतिनिधींचे आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना व बचत गटासाठीचे कर्ज वाटपाचे लक्षांक पुर्ण करणार्या बँकांचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अभिनंदन केले.
कृषि व तत्सम क्षेत्रे, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासाठी पीककर्ज वाटप यासह अन्य प्राथमिक व अप्राथमिक क्षेत्रांकरिता विभागवार बँकनिहाय उद्दिष्टे व पूर्तता, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, महिला बचत गटांना कर्ज वाटप , प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना व विविध महामंडळांतर्गत पतपुरवठा अशा विविध शासकीय योजनांतर्गत कर्जवाटपाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
तसेच सन २०२५-२६ या वर्षाचा सांगली जिल्ह्याचा जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे प्रकाशन जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते करण्यात आले. अग्रणी बँक व्यवस्थापक विडास वेताळ यांनी सादरीकरण केले.