सांगली : महिलांसाठी अध्यक्षपद आरक्षित असलेल्या सांगली जिल्हा परिषदेत तब्बल ३१ महिला निवडून येणार असून यामध्ये सर्वाधिक महिला मिरज तालुक्यातून निवडल्या जाणार आहेत. तासगाव तालुक्यातील महिलांना मात्र जिल्हा परिषदेत प्रतिनिधीत्व करण्यासाठी खुल्या गटातूनच नशिब अजमावावे लागणार आहे. अडीच वर्षानी होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी तयारीत असलेल्या काहींचा मात्र या आरक्षण सोडतीने हिरमोड केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या गटाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत शाळकरी मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून हे आरक्षण निश्चित करण्यात आले. मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषद मुदत संपल्याने बरखास्त झाली. त्यानंतर या ना त्या कारणाने जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडत गेल्याने अनेक इच्छुकांनी केलेली तयारी वाया गेली होती. आताही आपल्या गटात कोणते आरक्षण पडते याकडे अनेक इच्छुकांचे लक्ष लागले होते. यामुळे आरक्षण सोडतीसाठी इच्छुकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती.
जिल्हा परिषदेचे ६१ गट असूून अध्यक्ष पद महिला सर्वसाधारण गटासाठी आरक्षित करण्यात आले आहे. यामुळे अनेक महिला कार्यकर्त्यांचे गट आरक्षणाकडे लक्ष लागून राहिले होते.
महिलांसाठी सर्वाधिक गट मिरज तालुययात आरक्षित झाले आहेत. मिरज तालुक्यातून ८ महिला जिल्हा परिषदेत जाणार आहेत, तर या पाठोपाठ वाळवा ७, कडेगाव ४, खानापूर ३, शिराळा २, पलूस, आटपाडी प्रत्येकी एक गट महिलांसाठी आरक्षित करण्यात आला आहे. कडेगाव तालुक्यातून एकही जागा पुरूषासाठी शिल्लक नाही, तर तासगाव तालुक्यात एकही जागा महिलासाठी नाही.
सोडतीनुसार गटनिहाय आरक्षण, निवडणूक विभागाचा क्रमांक व नाव अनुक्रमे पुढीलप्रमाणे – महिला सर्वसाधारण – येलूर, वाकुर्डे बुद्रुक, जाडरबोबलाद, आरग, वांगी, नागनाथनगर नागेवाडी, डफळापूर, पणुंब्रे तर्फे वारूण, संख, करंजे, निंबवडे, कासेगाव, वाटेगाव, लेंगरे, बागणी, देशिंग, दुधोंडी, एरंडोली, रेठरे हरणाक्ष, महिला नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग – देवराष्ट्रे, पेठ, बिळूर, बोरगाव, कडेपूर, बुधगाव, कवठेपिरान, तडसर, महिला अनुसूचित जाती प्रवर्ग – म्हैसाळ (एस), मालगाव, कवलापूर, बेडग. सर्वसाधारण – बनाळी, कसबे डिग्रज, खरसुंडी, मांजर्डे, मांगले, चिंचणी, करगणी, कुंडल, भोसे, भिलवडी, येळावी, बावची, दरिबडची, भाळवणी, कामेरी, कोकरूड, विसापूर, चिकुर्डे, मणेराजुरी, नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग – शेगाव, दिघंची, मुचंडी, कुची, ढालगाव, वाळवा, अंकलखोप, समडोळी. अनुसूचित जाती प्रवर्ग – रांजणी, उमदी, सावळज.