Sanjana Jadhav : महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान पार पडतं आहे. प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. मात्र शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव एका सभेत ढसाढसा रडल्या आहेत. माझ्या वडिलांवर वाट्टेल तसे आरोप झाले पण आम्ही ते सहन केले. कारण लेकीच्या बापाने ते आरोप सहन करायचे असतात. असं म्हणत विभक्त पती हर्षवर्धन जाधव यांनी कसा अन्याय केला ते संजना जाधव ( Sanjana Jadhav ) यांनी सांगितलं.

संजना जाधव यांना शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने दिली उमेदवारी

संजना जाधव ( Sanjana Jadhav ) यांना यावेळी छत्रपती संभाजी नगरच्या कन्नड मतदारसंघातून तिकिट देण्यात आलं आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या त्या उमेदवार आहेत. तर याच मतदारसंघातून त्यांचे विभक्त पती हर्षवर्धन जाधव हे अपक्ष रिंगणात आहेत. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी संजना जाधव ( Sanjana Jadhav ) यांनी त्यांच्यावर झालेला अन्याय सांगितला. तसंच त्या भरसभेत ढसाढसा रडल्या.

हे पण वाचा- Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”

काय म्हणाल्या संजना जाधव?

“माझ्या वडिलांवर वाट्टेल ते आरोप झाले ते आम्ही सहन केले. एखाद्या मुलाचा बाप असता तर तो रस्त्यावर उतरला असता. मात्र एका मुलीचा बाप म्हणून माझे बाबा शांत बसले. माझ्यावर अनेक संकटं आली पण मी ती कुणाला बोलून दाखवली नाही. कारण ती माझी संस्कृती नाही. माझ्या मायबापांनी मला तसंच शिकवलं आहे. मी लग्न झाल्यानंतर एका महिन्यातच घरी आले. त्यावेळी माझे वडील मला म्हणायचे तुला मूल होऊदेत त्यानंतर हा माणूस (हर्षवर्धन जाधव) सुधारेल. मला मूल झालं, त्यानंतरही अन्याय झालाच. मला वडील (रावसाहेब दानवे) म्हणाले चाळिशी ओलांडली की माणूस सुधरतो. मी जे सहन केलं त्याचा मोबदला तर मिळालाच नाही. पण माझ्या जागेवर कुणाला आणून ठेवलं तुम्हाला माहीत आहे. माझी जागा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तुमच्या हृदयातली जागा कायम राहिली.” असं संजना जाधव ( Sanjana Jadhav ) म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी संघर्षकन्या आहे, तुम्हीच आता यातून मला बाहेर काढा

माझं लग्न झाल्यानंतर मला आईने सांगितलं होतं की आज तू माझ्या घरातून जाते आहेस. परत येशील तेव्हा तुझी तिरडी आली पाहिजे तू एकटी येता कामा नये. त्याप्रमाणेच मी संसार केला. मी आजवर कधीही रडले नाही, कशाचीही वाच्यता केली नाही. आज मला भरुन आलं कारण हे गाव माझं आहे आणि प्रत्येकाला माहीत आहे की मी काय केलं आणि काय केलं नाही. आज माझ्याबाबत घाणेरडी भाषा तुम्ही (हर्षवर्धन जाधव ) वापरत आहात. मी काय आहे हे जनतेला माहीत आहे. मी इतकंच सांगेन की मला जे संघर्षकन्या जे म्हणत आहात ते तसंच आहे. माझी ताकद आता कुठेतरी संपली आहे. आज मला संघर्षातून कुणी बाहेर काढू शकतं तर तुम्ही सगळेजण आहात. असं संजना जाधव यांनी म्हटलं आहे. मला खूप बोलायचं होतं पण माझ्या भावना दाटून आल्या आहेत म्हणून मी फक्त आशीर्वाद द्या असं मी तुम्हाला सांगते आहे असं संजना जाधव ( Sanjana Jadhav ) यांनी म्हटलं आहे.