वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला, शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार आणि महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत सातत्याने दावा करत आहेत की आम्ही (मविआ) वंचित बहुजन आघाडीला आमच्याबरोबर घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्यावर आमचा विश्वास आहे. आमचे आणि त्यांचे विचार सारखेच आहेत. आम्हाला आणि आंबेडकरांना देशाचं संविधान वाचवायचं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत होईल असं वागणार नाहीत. आमची प्रकाश आंबेडकरांशी अजूनही चर्चा चालू आहे.

संजय राऊत अजूनही आघाडी मजबूत असल्याचा दावा करत असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी थेट संजय राऊत यांनाच लक्ष्य केलं आहे. आंबेडकरांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये संजय राऊत वंचित बहुजन आघाडीच्या पाठीत चाकू खुपसत आहेत असं चित्र दाखवण्यात आलं आहे. तसेच त्यांनी म्हटलं आहे की, संजय राऊत, तुम्ही किती खोटं बोलणार? तुम्ही म्हणताय की तुमचे आणि आमचे विचार एकसारखे आहेत तर मग तुमच्या बैठकांमध्ये तुम्ही आम्हाला का बोलवत नाही? ६ मार्च रोजी फोर सीझन्स हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला आमंत्रित का केलं नाही? तुम्ही आजही वंचितला आमंत्रित न करता बैठक बोलावली आहे, आमच्याशिवाय बैठक का करताय? तुम्ही तर मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे. सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली होती ते आम्हाला माहिती आहे. अकोल्यात आमच्याविरोधात उमेदवार उभा करण्याबाबत तुम्ही मुद्दा उपस्थित केला होता हे खरं नाही का? एका बाजूला आघाडी बनवत असल्याचं चित्र निर्माण करताय आणि दुसऱ्या बाजूला आम्हालाच पाडण्याचा कट रचताय,

प्रकाश आंबेडकर यांच्या या आरोपांना संजय राऊत यांनी आज (२९ मार्च) प्रत्युत्तर दिलं. राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, आमची लढाई ही संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या विरोधात आहे. प्रकाश आंबेडकर जे काही बोलत आहेत त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र बसलो. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. अनेक बैठका केल्या, या बैठकांमध्ये वंचितचे प्रतिनिधी आणि काही वेळा स्वः प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. आम्ही आता प्रकाश आंबेडकर यांना लोकसभेच्या पाच जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. आता त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी निर्णय घ्यायचा आहे.

हे ही वाचा >> “दाऊदची मदत घेणाऱ्या गोविंदाला पक्षात घेताना…”, भाजपाचा उल्लेख करत ठाकरे गटाचा एकनाथ शिंदेंना टोला

संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर कालपर्यंत नाना पटोलेंवर आरोप करत होते. आता माझ्याबद्दल बोलतायत, त्यांना आता मी काय बोलणार… परंतु, मला विश्वास आहे की प्रकाश आंबेडकर संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या बाजूने जाणार नाहीत. त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणार नाहीत. महाविकास आघाडीने आतापर्यंत प्रत्येक बैठकीत प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाला आमंत्रित केलं आहे. तुम्ही माध्यमांनीदेखील ते पाहिलं असेल की अनेक बैठकांनंतर वंचितच्या नेत्यांनी आणि प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः तुमच्याशी बातचीत केली आहे. त्यांचा पक्ष केवळ काल (२८ मार्च) झालेल्या बैठकीत सहभागी झाला नाव्हता. परंतु, त्या बैठकीतही त्यांच्याविषयी चर्चा झाली. प्रकाश आंबेडकरांसाठी आणखी जास्त काय करता येईल यावरही चर्चा करण्यात आली.