Sanjay Raut on Raj and Uddhav Thackeray TMC Election : “दोन ठाकरे बंधूंची (उद्धव ठाकरे व राज ठाकरे) युती पक्की आहे”, असं वक्तव्य शिवसेनेचे (उबाठा) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तसेच ज्यांना सोबत यायचं आहे त्यांचं आम्ही स्वागत करू असंही राऊत म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे व राज ठाकरे सोबत आले आहेत, असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका निवडणुकीत आम्ही ७५ हून अधिक जागा जिंकू असा दावा देखील त्यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. त्यामुळे ज्यांना आमच्यासोबत यायचं असेल त्यांचं आम्ही स्वागत करू. ही युती पक्की आहे. मी महाविकास आघाडी बद्दल देखील वारंवार सांगत आलो आहे. जे सोबत येतील त्यांना आम्ही घेऊन पुढे जाऊ.”
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठा निर्णय
दरम्यान संजय राऊत यांना विचारण्यात आलं की राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार का? त्यावर संजय राऊत म्हणाले की “मी अनेकदा स्पष्ट केलं आहे की महाविकास आघाडी ही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी होती. इंडिया ब्लॉक हा लोकसभा निवडणुकीसाठी होता. तर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अशी कुठलीही आघाडी नसणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अद्याप अशा प्रकारची कुठलीही चर्चा कोणत्याही पक्षांमध्ये झालेली नाही.”
“शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे या क्षणी एकत्र आहेत. मुंबईसाठी व मराठी माणसाला वाचवण्यासाठी आम्ही आणि मनसे एकत्र लढणार आहोत. ठाण्यात देखील आम्ही एकत्र लढणार आहोत आणि सत्तेत येणार आहोत.”
दोन ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या करतील : राऊत
“महायुतीने ठाण्यात ७० पारचा नारा दिला आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, “आमचा नारा ‘७५ पार’चा आहे. दोन ठाकरे एकत्र आल्यावर काहीही शक्य होऊ शकतं. ‘दो ठाकरे सब पे भारी’, निवडणूक लढण्यावर चर्चा होत राहील. हा सोबत येणार का तो सोबत येणार हे अजून ठरलं नसलं तरी या क्षणी दोन ठाकरे हे एकत्र असून ते सर्वांच्या ठिकऱ्या करतील.”