प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतल्या नेत्यांसह राज्यातल्या जनतेला गोंधळात टाकलं आहे. वंचित बहुजन आघाडी आणि वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे कधी मविआबरोबरचे वाद समोर येतात, तर कधी मविआ नेते सांगतात की, आमच्यात सकारात्मक चर्चा चालू आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे की, आमचा पक्ष अद्याप मविआचा सदस्य नाही. मात्र वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होण्यास इच्छुक आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष वंचितला सामावून घेण्यास अनुकूल आहेत. मविआतला प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाशी वंचितची आधीपासूनच युती आहे. तरीदेखील वंचितच्या महाविकास आघाडीतल्या सहभागाबाबत संभ्रम कायम आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेच्या ठाकरे गटाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला डावलून थेट आणि केवळ काँग्रेसची चर्चा सुरू केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, “मी महाराष्ट्रातील ७ जागांवर वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. काँग्रेसने त्यांना राज्यात मिळालेल्या कोणत्याही ७ मतदारसंघांची नावं आम्हाला द्यावी. त्या सात जागांवर वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला पाठिंबा देईल, काँग्रेस उमेदवाराला मैदानी आणि धोरणात्मक सहाय्य करेल.” त्यापाठोपाठ आंबेडकर यांनी वंचित मविआबरोबर राहण्याची शक्यता नाही, असं वक्तव्य केलं आहे.

वंचितबाबत संभ्रम कायम असताना आज महाविकास आघाडीने एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मविआने वंचितला आजच्या बैठकीचं निमंत्रण दिलेलं नाही. त्यामुळे वंचितची महाविकास आघाडीबरोबरची चर्चा फिस्कटली आहे का? असा प्रश्न निर्माण केला जात आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी हाच प्रश्न ठाकरे गटातील खासदार आणि मविआचे प्रमुख नेते संजय राऊत यांना विचारला. त्यावर संजय राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

खासदार संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे आमच्यासाठी सन्माननीय नेते आहेत. आमची त्यांच्याशी अनेकदा चर्चा झाली आहे. या चर्चेदरम्यान, महाविकास आघाडीने त्यांना राज्यात चार जागा देण्याचं ठरवलं आणि तसा प्रस्ताव आम्ही वंचितसमोर ठेवला. त्यांनी निवडलेल्या २७ जागांपैकी चार जागांचा प्रस्ताव आम्ही त्यांच्यासमोर ठेवला होता. परंतु, आम्हाला वंचितची वेगळी भूमिका दिसतेय. आम्ही वंचितला दिलेला चार जागांचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला असता तर आम्हाला नक्कीच आनंद झाला असता. आमचा देशातल्या हुकूमशाहीविरोधात लढा चालू आहे, संविधान वाचवण्याच्या आमच्या लढ्याला प्रकाश आंबेडकर यांच्या येण्याने हातभार लागला असता. त्यांच्या आमच्यातील सहभागाने आमच्या लढ्याला आणखी गती आणि बळ मिळालं असतं.

हे ही वाचा >> फडणवीसांनी मध्यरात्री घेतली राज ठाकरेंची भेट, काय चर्चा झाली? उपमुख्यमंत्री म्हणाले…

संजय राऊत म्हणाले, मला अजूनही खात्री की, महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि वंचितचे नेते एकत्र बसतील. त्यांच्यात सकारात्मक चर्चा होईल. प्रकाश आंबेडकर यांच्या मनात काही नाराजी असेल, अस्वस्थता असेल ती दूर करण्यात आमच्या नेत्यांना यश मिळेल.