लोकसभेची नाशिकची जागा कुठल्याही परिस्थितीत मित्रपक्षाला मिळू नये म्हणून शिवसेना-भाजपामध्ये स्थानिक पातळीवर चाललेला संघर्ष ठाण्यापाठोपाठ मुंबईत पोहोचला आहे. शिवसेना मंत्री, आमदार, खासदारांनी रविवारी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडं घातल्यानंतर सोमवारी भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांनी सागर बंगला गाठत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मतदारसंघात भाजपची ताकद असल्याने शिवसेनेला जागा देण्यास विरोध दर्शवला. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) हेमंत गोडसे हे नाशिकचे विद्यमान खासदार आहेत. परंतु, त्यांच्या उमेदवारीला नाशकात भाजपाचा विरोध आहे. तसेच नाशिकची लोकसभेची जागा मिळावी यासाठी अजित पवार गटही आग्रही आहे. त्यामुळे महायुतीतल्या जागावाटपात नाशिकबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मतदान अवघ्या काही दिवसांवर असून उमेदवारी जाहीर न झाल्याने विद्यमान खासदार हेमंत गोडसे महायुती आणि एकनाथ शिंदेंवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, हेमंत गोडसेंच्या नाराजीवर त्यांचे जुने सहकारी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, शिंदे गटावर नाराज असलेल्या हेमंत गोडसेंसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे दरवाजे उघडे आहेत का? यावर खासदार संजय राऊत म्हणाले, खासदार गोडसे हे सध्या शिंदे गटात असले तरी आम्ही त्यांना निवडून आणलं होतं. परंतु, आता कोणत्याही गद्दारासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे नाहीत. तुम्ही आमचा दरवाजा ठोठावलात, अंगणात बसलात, छाती बडवली तरीदेखील गद्दारांसाठी आमचे दरवाजे उघडले जाणार नाहीत. आम्ही भविष्यात गद्दारांसाठी दरवाजे उघडले तर मला वाटतं की, आमच्या निष्ठावंतांचा अपमान होईल. अनेक निष्ठावान, प्रामाणिक, स्वाभिमानी जनता आणि स्वाभिमानी शिवसैनिक मिळून आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्र आलो आहोत. गद्दारांसाठी दरवाजे उघडले तर या सर्व निष्ठावंतांचा अपमान होईल.

खासदार संजय राऊत म्हणाले, शिंदेंच्या अनेक खासदारांचे पत्ते कट होणार (तिकीट कापलं जाणार) आहेत. शिंदेंचाही पत्ता कट होऊ शकतो. शिंदेंचे अनेक खासदार शिंदेंना डावलून परस्पर देवेंद्र फडणवीस यांना भेटत आहेत. कारण लोक योग्यतेनुसार भेटायला जातात. लोक आधी पाहतात की पॉवर सेंटर कुठे आहे, महत्त्वाचे निर्णय कोण घेऊ शकतं, त्यानुसार लोक त्या त्या व्यक्तीकडे जातात. लोक कळसुत्री बाहुल्यांकडे जात नाहीत, बोलक्या बाहुल्यांकडे जात नाहीत, लोक बाहुल्यांची सूत्र हालवणाऱ्यांकडे जातात.

हे ही वाचा >> “१७ रुपयांची साडी वाटून…”, बच्चू कडूंचा नवनीत राणांवर हल्लाबोल; महायुतीतलं वातावरण तापलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उमेदवारी मिळण्यापूर्वीच गोडसेंकडून प्रचाराला सुरुवात

नाशिक लोकसभेची जागा महायुतीत कोणाला मिळणार, याचा तिढा सुटलेला नसताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी शनिवारी हनुमान मंदिरात आरती करुन प्रचाराचा शुभारंभ केला. या जागेवर दावा सांगणारे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी मात्र यावेळी अनुपस्थित होते. शिवसेनेच्या कृतीवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नसताना गोडसेंनी अनधिकृतपणे प्रचाराला सुरुवात केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.