scorecardresearch

“राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, सावित्रीबाईंची चेष्टा केली त्याच्याविषयी विरोधी पक्षनेत्यांनी…”; राऊतांची टीका

मंगळवारी फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या गौप्यस्फोटांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय

Fadnavis and Raut
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांवर केली टीका (फाइल फोटो)

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केलेल्या गौप्यस्फोटांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. फडणवीस यांनी राज्यातील सरकार भाजपाच्या मंत्र्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केल्यानंतर राऊत यांनी फडणवीस यांना काही प्रश्न विचारले आहेत. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना या आरोपांसंदर्भात विचारणा करण्यात आली असता राऊत यांनी फडणवीस यांच्या आरोपांवर मत मांडलं.

ईडीसंदर्भातील आरोपांवर का बोलत नाही?
“विरोधी पक्षाच्या नेत्याचं काम असतं की आरोप करणं. आरोप करतात, सनसनाटी निर्माण करतात, वृत्तपत्रात जागा घेतात. काल सुद्धा एक आरोप झाला मी पाहिलं,” असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांकडून झालेले आरोप हे फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं सूचित करणारं वक्तव्य केलं. “खळबळ माजवणं हा विरोधी पक्षाचा हेतू असेल तर ती खळबळ सुद्धा माजलेली नाही, हे मी सांगू इच्छितो. काल मी ईडीवर पुराव्यासहीत आरोप केलेत. ते खळबळजनक आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा काय काम करतायत, खंडणीखोरीची प्रकरणं समोर आणली आहेत. त्यावर फडणवीस का बोलत नाहीत?”, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केलाय.

…तर पेनड्राइव्हला महत्वं आलं असतं
तसेच संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल फडणवीस का वक्तव्य करत नाही असाही प्रश्न विचारलाय. “राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. राज्यपालांनी सावित्रीबाई फुलेंची चेष्टा केली. त्याच्याविषयी राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी (फडणवीस यांनी) सभागृहात काही भूमिका घेतली असती तर नक्कीच त्यांच्या पेनड्राइव्हला काही महत्वं आलं असतं,” अशी टीका राऊत यांनी केलीय.

“तुम्ही एकतर्फी काम करताय. एकतर्फी बोलताय. विरोधी पक्षनेता हा एका पक्षाचा नसतो तो राज्याचा असतो. तो पक्षाची भूमिका मांडत नसतो तर जनतेची भूमिका मांडतो. हे बहुतेक आपले विरोधी पक्षनेते विसरले आहेत,” असा टोला राऊत यांनी फडणवीस यांना लागवलाय.

ते कुंभांड होतं…
“गिरीश महाजनांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. पण महाराष्ट्राचे पोलीस असं कधी करत नाही. महाराष्ट्राच्या पोलिसांना एक चांगलं प्रशिक्षण आहे. राज्याच्या पोलिसांना देशात यासाठी प्रतिष्ठा आहे की ते राजकीय दबावाखाली खोट्या कारवाया करत नाहीत. राजकीय दबावाखाली ज्यांनी आमचे फोन टॅप केले त्या अधिकाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल झालाय. ते कुंभांड होतं,” असं राऊत फडणवीसांच्या आरोपांबद्दल बोलताना म्हणालेत.

…तर सीबीआय, ईडीकडे पाठवावं लागेल
पुढे बोलताना राऊत यांनी, असे खोटे आरोप करायचे असतील आणि ते सिद्ध करायचे असतील तर महाराष्ट्र पोलिसांना सीबीआय आणि ईडीकडे प्रशिक्षणासाठी पाठावं लागेल अशी उपहासात्मक टीका केलीय. “कुंभांड रचायचं असेल तर आम्हाला त्यांना (महाराष्ट्र पोलिसांना) ईडी आणि सीबीआयकडे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवावं लागेल. कुंभांड कसं करतात? खोट्या कारवाया कशा करतात? राजकीय नेत्यांना खोट्या कारवायांमध्ये कसं अडकवायचं? खोटे पुरावे, खोटे साक्षीदार कसे निर्माण करायचे हे काम सध्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरुय. महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्याकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल. पण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशाप्रकारचं प्रशिक्षण पोलिसांना घेऊ देणार नाहीत,” असं राऊत म्हणालेत.

दुसरा पेन ड्राइव्ह घेऊन येईल…
“त्यांनी एक सननाटी तयार करायची होती. ती त्यांनी केली. पण हे स्क्रिप्ट कोणी लिहिलेलं आहे? भाजपाचे सलीम-जावेद कोण आहेत? त्यातली पात्र कोण आहेत? नेपथ्य कोणाचं आहे? दिग्दर्शन कोणाचं आहे? त्याच्या खोलाशी सरकार नक्की जाईल आणि दुसरा पेन ड्राइव्ह घेऊन समोर येईल,” असा टोलाही राऊथ यांनी लगावलाय.

फडणवीसांनी काय आरोप केले?
राज्य सरकारने भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट फडणवीसांना मंगळवारी विधानसभेत केला. याबाबतचे ध्वनिचित्रमुद्रण त्यांनी पेनड्राईव्हच्या माध्यमातून उपाध्यक्षांकडे पुराव्यासाठी सादर केले. ‘‘विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांच्या सत्ताधारी नेत्यांशी आणि इतरांशी झालेल्या संभाषणांमध्ये आपल्याबरोबरच माजी मंत्री गिरीश महाजन आणि अन्य भाजपा नेत्यांना अडकविण्याचे षडम्यंत्र रचले गेल्याचे दिसून येत़े  विशेष सरकारी वकिलांच्या संभाषणात शरद पवार, अजित पवार यांच्यासह काही मंत्री, पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्तांचा उल्लेख आहे. विरोधकांना संपविण्यासाठी अशी षडयंत्रे रचण्यात येत असल्याने हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपविण्याची मागणी फडणवीस यांनी केली.

…तर भाजपा न्यायालयात जाईल
कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्दय़ावर राज्य सरकारवर टीकेची झोड उठविताना सत्ताधारी नेते, सरकारी वकील आणि पोलिसच विरोधकांना संपविण्यासाठी खोटे पुरावे तयार करुन गुन्ह्यांमध्ये अडकवीत असतील तर राज्यात लोकशाही शिल्लक आहे का, असा सवाल फडणवीस यांनी केला. सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी दिले नाही, तर भाजपा न्यायालयात जाईल. आरपारच्या लढाईसाठी आम्ही तयार आहोत, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

सुमारे १२५ तासांचे ध्वनिचित्रमुद्रण
फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्याविरुध्द मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात कसे कारस्थान रचले गेले, याची इत्यंभूत माहिती आणि अनेक नेत्यांमध्ये झालेल्या संभाषणांच्या ध्वनिचित्रफीती आणि त्यातील तपशील विधानसभेत सादर केले. सुमारे १२५ तासांचे ध्वनिचित्रमुद्रण आपल्याकडे असल्याचे नमूद करत त्यातील अनेक ध्वनिचित्रफीती फडणवीस यांनी उपाध्यक्षांकडे सोपवल्या.

चाकूला रक्त लावून कसे ठेवावे, पोलिसांनी धाड कशी घालावी याची माहिती दिली
मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेत पाटील आणि भोईटे गटबाजी आह़े  महाजन यांचे स्वीय सहाय्यक रामेश्वर यांनी भोईटे गटाची बाजू घेऊन दुसऱ्या गटाला धमकी दिली व महाजन यांचा दूरध्वनी आला होता, असा आरोप करुन २०१८ च्या या पुण्यातील कथित गुन्ह्यात २०२१ मध्ये मुक्ताईनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. महाजन यांना मोक्का कायद्यानुसार कारवाईत कसे अडकविता येईल, यासाठी सरकारी वकील चव्हाण यांनी चाकूला रक्त लावून कसे ठेवावे, पोलिसांनी धाड कशी घालावी, साक्षीदार, पंच यांचे जबाब याविषयी सविस्तर सल्ला संबंधितांना दिल्याचे ध्वनिचित्रमुद्दण फडणवीस यांनी सादर केले.

किमान ३०० कोटी रुपये जमा केले
भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी आमदार अनिल गोटे यांच्या सूचना काय होत्या, महाजन यांच्याबरोबरच फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, संजय कुंटे, चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार रावल या नेत्यांनाही खोटय़ा गुन्ह्यांमध्ये अडकवायचे, याबाबत काय संभाषण झाले, याचा तपशील फडणवीस यांनी सादर केला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बदल्या व अन्य माध्यमातून किमान ३०० कोटी रुपये जमा केले होते, तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या संदर्भातील उल्लेख, मंत्र्यांकडे झालेल्या कथित बैठका, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, अजित पवार व जयंत पाटील यांच्या संदर्भात सरकारी वकील चव्हाण व इतरांच्या संभाषणांमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखांविषयी फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut slams devendra fadnavis for not talking about governor comment on chatrapati shivaji maharaj and savitribai phule scsg