शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत हे भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पत्रकार परिषदांतून टीकास्र सोडणारे संजय राऊत आता एक्सवरही सक्रिय असतात. नुकतेच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या एक्स अकाऊंटवरील एका पोस्टवर खोचक टीका केली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस(खरी) च्या प्रचाराची तुतारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सातारा येथे फुंकली.. हा एक अपूर्व योगायोग! लवकरच ते अशा प्रकारे शिवसेनेची मशाल घेऊनही राज्यात फिरतील”, अशी उपरोधिक टीका संजय राऊत यांनी एक्स वर केली आहे.

“मनोज जरांगेंचा बोलविता धनी कोण हे फडणवीसांना माहीत नसेल तर..”, संजय राऊत यांची टीका

प्रकरण काय आहे?

सातारा जिल्ह्यामधील भाजपाचे नेते, राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यातील जलमंदिर पॅलेस या उदयनराजेंच्या घरी जाऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले. याप्रसंगी फडणवीस यांचे तुताऱ्यांच्या निनादात स्वागत करण्यात आले होते. हा व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर शेअर केला होता. याच व्हिडिओवरून संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, फडणवीस यांच्या उपस्थितीत आमच्या विजयाची तुतारी फुंकली गेली आहे. हा एक अपूर्व योगायोगच असून ते लवकरच शिवसेनेची मशाल घेऊन राज्यात फिरतील. ही तर श्रींची इच्छा! फडणवीस यांनी माहविकास आघाडीच्या विजयाची तुतारी फुंकल्या बद्दल त्यांचे आभार!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह देण्यात आले. त्यानंतर शरद पवार गटाच्या वतीने रायगड किल्ल्यावर या चिन्हाचे अनावरण केले. तेव्हापासून तुतारीला घेऊन राष्ट्रवादीचा अनोखा प्रचार सुरू आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या नव्या चिन्हावर आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे. अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गटाला आता नवे चिन्हा लोकापर्यंत पोहोचवण्याचे नवे आव्हान उभे राहिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान उदयनराजे भोसले यांच्या सातारा येथील जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी प्रमुख मान्यवरांचे नेहमीच पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जात असते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही त्याप्रमाणेच स्वागत करण्यात आले. त्याचाच व्हिडिओ शेअर करून संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला.