महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी संपली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. येत्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देण्याची शक्यता आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील आणि शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल येत्या एक-दोन दिवसात लागेल. हा निकाल आमच्या विरोधात जाईल आणि आमचं सरकार पडेल, असं काही लोकांना वाटत आहे. पण असं काहीही होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही आम्हीस सत्तेत राहू, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे-फडणवीस सरकार पडेल आणि महाराष्ट्रात सत्ताबदल होईल, या चर्चेबद्दल विचारलं असता संजय शिरसाट म्हणाले, “महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा जो पेच निर्माण झाला आहे. त्याचा निकाल निश्चितपणे एक-दोन दिवसात लागेल. परंतु याचा अर्थ असा नाही की, हा निकाल आमच्या विरोधात जाईल. आमचे १६ आमदार अपात्र ठरतील आणि आम्ही सत्तेतून बाहेर जाऊ, याबाबत काही लोकांना उत्सुकता आहे. पण असं काहीही होणार नाही, आम्ही कायम सत्तेत राहणार आहोत. हा निकाल आमच्या बाजुने लागेल, असा आम्हाला विश्वास आहे.”