Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबरमध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली असून, यातील एक आरोपी मात्र अद्याप फरार आहे. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येमागे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणात अटक केली आहे. अशात आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गंभीर आरोप करत, आरोपींची बी टीम धमकी देत असल्याचा आरोप केला आहे.

याबाबत बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, “आम्हाला, आमच्या गावाला का धमकावण्याच येत आहे? आरोपींचे समर्थन करणारे फेसबुकवर कमेंट्स करत आहेत, स्टेटस ठेवत आहेत. बी टीममधील तर चार नावे स्पष्ट आहेत, जे आरोपींना सोडवायला गेले होते. माझ्या भावाच्या गाडीमागे जी गाडी होती, ती घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे. आजही जेव्हा आरोपींची सुनावणी असते, तेव्हा त्यांची टीम त्यांच्या अवतीभोवती असते.

सीआयडी, एसआयटी व न्यायालयीन चौकशीच्या माध्यमातून तपास

सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली आहे, मात्र, अद्यापही एक आरोपी फरार आहे. या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी, एसआयटी व न्यायालयीन चौकशीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ही घटना घडल्यानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी तसेच वाल्मिक कराडचं कनेक्शन, खंडणीचे प्रकार या सगळ्याला वाचा फोडण्याचं काम भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केलं आहे. या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत हे प्रकरण लावून धरले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनंजय मुंडे अडचणीत

दुसरीकडे वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येमागचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. तो कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यामुळे, मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे. विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर आणि वाल्मिक कराडवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांत सोशल मीडिया आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मुंडे यांच्या विरोधात अनेक पुरावेही सादर केले आहेत.