सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये यंदाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व यशस्वीपणे साजरा करण्यात आला. या उपक्रमाला जिल्ह्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. विशेषतः निर्माल्य व्यवस्थापन उपक्रमाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात सरासरी ५४ टन निर्माल्य जमा होऊन कंपोस्ट खत तयार करण्यासाठी पाठविण्यात आले. या प्रक्रियेसाठी ३३८ घंटागाड्या व १०४९ ट्रॅक्टर वापरण्यात आले. यामध्ये विविध संस्था व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यामुळे जिल्ह्यातील नदी, तळी व विहिरींचे पाणी दूषित होण्यापासून मोठ्या प्रमाणावर बचाव झाला. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन उपक्रमांतर्गत एकूण ८८० सार्वजनिक गणपती व ४६,५५९ घरगुती गणपतींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. तसेच ४,५११ मूर्ती पुन्हा कुंभारांकडे परत देण्यात आल्या, तर ४७,४३९ मूर्ती ग्रामपंचायतींकडे जमा होऊन विधिवत पुनर्विसर्जन करण्यात आले. अशा प्रकारे एकूण ६२,१३७ मूर्तींचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.
या उपक्रमात नागरिक, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आणि अधिकारी–पदाधिकारी यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, शिक्षक, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, युवक मंडळे, गणेश मंडळे यांनी आपापला मोलाचा सहभाग नोंदविला. याबाबतची माहिती ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी दिली. संकलित निर्माल्यापासून नाडेप व गांडूळ खत प्रकल्पामध्ये खतनिर्मिती करावी, तसेच प्लास्टिक वेगळे संकलित करून केंद्रावर पाठवावे, अशी सूचना उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) प्रज्ञा माने-भोसले यांनी दिली. तर, संकलित झालेल्या मूर्तींची योग्य नोंद ठेवून त्यांचे विधिवत पुनर्विसर्जन करावे किंवा कुंभारांना परत द्याव्यात, अशी सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद यांनी केली.
सातारा जिल्ह्यातील सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव यशस्वीरित्या पार पडला. गावागावच्या विहिरी, नद्या व तळी प्रदूषित होण्यापासून प्रशासनाला यश मिळाले. साताऱ्याने पर्यावरणपूरकतेचा नवा आदर्श निर्माण केल्याबद्दल सर्व नागरिक व जिल्हावासीयांचे कौतुक आहे. संतोष पाटील, जिल्हाधिकारी
धर्माधिकारी प्रतिष्ठानची मोहीम
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवात विसर्जन निमित्त जिल्ह्यात निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सातारा शहर, वाई, भुईंज, कराड, धोंडेवाडी, वडूज, पुसेगाव, पाटण या दहा ठिकाणी दहा टन निर्माल्य संकलित केले. संकलित निर्माल्यातील प्लास्टिक पिशव्या तसेच विघटन न होणाऱ्या वस्तू,पदार्थ निवडून त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमात ७०१ सदस्यांनी सहभाग घेतला. ६७६.७६ किलो प्लास्टिक वेगळे करण्यात आले. शेकडो किलो प्लास्टिक कराड पालिकेच्या प्लास्टिक संकलन केंद्राला पाठविण्यात आले.
विसर्जन आणि नदी स्वच्छता
गणपती विसर्जन संगम माहुली सातारा येथे कृष्णा नदीत करण्यात आले होते. या वेळी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडलेले होते. दोन दिवसांनंतर पाणी पातळीत घट झाली. त्यामुळे अनेक मूर्ती नदी किनाऱ्यावर विखुरलेल्या उघड्या झाल्या होत्या. काही गणपतीमूर्ती तशाच पडून अवहेलना होत होती. याबाबत समाज माध्यमांवर छायाचित्र चित्रफिती प्रसारित झाल्यानंतर संगम माहुली ग्रामस्थ, शिवप्रतिष्ठान, सनातन, हिंदू जनजागृती, गुरू अकादमी, नानासाहेब धर्माधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सातारकर सुजान नागरिक यांनी आज सकाळी कृष्णा नदी किनाऱ्यावरील गणपतीच्या मूर्तीची अवहेलना न करता मुख्य नदी पात्रात विसर्जित केल्या आणि किनाऱ्यावरची स्वच्छता केली.