सातारा : साहित्य संमेलन ही कधीकाळी मूठभर साहित्यिकांसाठीची परंपरा होती. तिचा प्रसार सुरू असून जनसामान्यांशी याचे नाते जोडले गेले आहे. साताऱ्याचे ९९ वे साहित्य संमेलन हे हा परीघ वाढवणारे संमेलन ठरेल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने निश्चितच त्याचा फायदा आपण सर्वांनी घ्यायचा आहे. मराठी मातृभाषा म्हणून आवश्यक आहे. परंतु, जगामध्ये संपर्क वाढवायचा असेल तर इंग्रजी आवश्यक आहे, त्यामुळे इंग्रजी भाषेला आपण मावशी करुया. तिच्या मदतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जगभरात पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया, असे आवाहन लेखक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी केले.
सातारा येथील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, विशेष उपस्थिती खा. उदयनराजे भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून रोजगार हमी, फलोत्पादन आणि खार जमीन विकासमंत्री भरतशेठ गोगावले यांची उपस्थिती होती. यावेळी संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अमोल मोहिते, उपाध्यक्ष विजय बडेकर आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले, की साहित्य संमेलन म्हटले की, कुठल्याही समस्यांवेळी साहित्य धीर देण्याचे काम करते. सामान्य वाचकाचा साहित्याशी यातूनच आपुलकीचा धागा तयार होतो. हे सामान्य वाचक प्रत्यक्ष साहित्य निर्माण करत नसले तरी वाचन प्रक्रियेतून त्यांचा संबंध येतो. या अर्थाने संमेलने ही सर्वांना सोबत घेणारी व्हावीत, ही अपेक्षा आगामी साताऱ्यातील संमेलन पूर्ण करेल.
जावडेकर पुढे म्हणाले, साहित्य संमेलन म्हटले की, ते होण्यापूर्वी साहित्य वर्तुळात फटाके फुटण्यास सुरुवात होते. संमेलन पुढे न्यायचे असेल तर तरुण पिढी त्यात येणे आवश्यक आहे आणि त्यासाठी अगोदर तरुण लेखक यायला पाहिजेत. ९९ व्या संमेलन हे ऐतिहासिक होणार असून यानिमित्ताने सातारा-पुणे ऐतिहासिक संबंधांची पुनरावृत्ती होईल. साहित्य संमेलन ही कधीकाळी मूठभर साहित्यिकांसाठीची परंपरा होती. तिचा प्रसार सुरू असून जनसामान्यांशी याचे नाते जोडले गेले आहे. साताऱ्याचे ९९ वे साहित्य संमेलन हे हा परीघ वाढवणारे संमेलन ठरेल.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने निश्चितच त्याचा फायदा आपण सर्वांनी घ्यायचा आहे. मराठी मातृभाषा म्हणून आवश्यक आहे. परंतु, जगामध्ये संपर्क वाढवायचा असेल तर इंग्रजी आवश्यक आहे, त्यामुळे इंग्रजी भाषेला आपण मावशी करुया. तिच्या मदतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जगभरात पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया, यावेळी खा. उदयनराजे भोसले, मंत्री भरतशेठ गोगावले, संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आदींची भाषणे झाली.