सातारा : चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर शुगर मिल्स आणि मिल्सच्या डिस्टिलरी विभागातून तिळगंगा नदीपात्रात वारंवार मळी आणि रसायन (केमिकल)मिश्रित सांडपाणी सोडले जात असल्याने नदीचे पाणी दूषित होऊन नदीकाठचे नागरिक व शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कुमठे (ता. कोरेगाव) ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी शासनाच्या अनेक विभागांना व जरंडेश्वर शुगर मिलला वारंवार कळवूनही जरंडेश्वर शुगर मिल्स आणि डिस्टिलरी विभाग मळी आणि रसायनयुक्त टाकाऊ पाणी मोठ्या प्रमाणामध्ये तिळगंगा नदीपात्रात सोडत आहे. या मळी व रसायनयुक्त (केमिकलयुक्त) टाकाऊ पाण्यामुळे कुमठे गावालगतच्या बंधाऱ्यातही मळीयुक्त पाण्याचा मोठा साठा झालेला आहे. कुमठे गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची सार्वजनिक विहीरही या बंधाऱ्यापासून जवळ १० ते १३ फूट नदीलगत आहे. त्यामुळे सध्या या बंधाऱ्यातून मळीयूक्त पाण्याचा पाझर सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही बाब कुमठे ग्रामपंचायतीच्या वतीने वारंवार जरंडेश्वर शुगर मिल प्रशासनास कळवण्यात आली आहे.

मात्र, मिल प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सातारा येथील उपप्रादेशिक अधिकारी अमीर सातपुते हेही जरंडेश्वर शुगर मिल्सच्या व्यवस्थापनास पाठीशी घालून सर्वसामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळत आहेत. ग्रामपंचायतीने याबाबत सर्व विभागांना पत्रव्यवहार करून कळवूनही यावर कोणीही काहीही सहकार्य करत नाही. आपण तातडीने जरंडेश्वर शुगर मिल प्रशासनास सूचना देऊन कुमठे गावाचा दूषित पाण्याचा प्रश्न सोडवावा असे निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत कुमठे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष गुलाब चव्हाण यांनी पुणे येथील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना एक निवेदन दिले आहे. याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार, पुणे येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, नवी दिल्ली येथील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, सातारा येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी व जरंडेश्वर शुगर मिलच्या सरव्यवस्थापक यांनाही पाठवण्यात आले आहे.

गावातील विहिरी प्रदुषित

जरंडेश्वर शुगर मिल्स आणि डिस्टिलरी विभाग मळी आणि रसायनयुक्त टाकाऊ पाणी मोठ्या प्रमाणामध्ये तिळगंगा नदीपात्रात सोडत आहेत. त्यामुळे गावातील विहिरी त्यामुळे गावालगतच्या बंधाऱ्यातही मळीयुक्त पाण्याचा मोठा साठा झाला आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत हे पाणी मिसळत असल्याचे कुमठे (ता. कोरेगाव) गावाचे सरपंच संतोष गुलाब चव्हाण यांनी सांगितले.