सातारा: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या वरिष्ठ महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. या मृत डॉक्टर तरुणीच्या तळहातावर तिच्या आत्महत्येमागील कारण लिहून ठेवलेले आढळले आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही सध्या फरारी असून त्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या उपनिरिक्षकास निलंबित करण्यात आल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अर्जुन काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या संबंधित डॉक्टर तरुणीने येथील एका हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री उशिरा आत्महत्या केली.

हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. या मृत डॉक्टर तरुणीच्या तळहातावर तिच्या आत्महत्येमागील कारण लिहून ठेवलेले आढळले आहे. त्यामध्ये फलटण येथेच कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षक आणि एका व्यक्तीवर व्यक्तींना या आत्महत्येस जबाबदार धरण्यात आल्याचा तपशील आहे.

आज सकाळी हा प्रकार उघडकीस येताच सर्वत्र खळबळ उडाली. घटनास्थळी तातडीने पोलिस दाखल झाले. वरिष्ठ पोलिस अधिकारीही हजर होत त्यांनी तपासाबाबत सूचना दिल्या. तसेच संशय व्यक्त करण्यात आलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही सध्या फरारी असून त्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.

घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान या घटनेमुळे सातारा जिल्हा व फलटणसह संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेली ही डॉक्टर तरूणी गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या एका वादामध्ये अडकली होती. या तपासणीसंदर्भात त्यांची विभागांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती.

या चौकशीमुळे संबंधित महिला डॉक्टर मोठ्या मानसिक तणावाखाली होती. यातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलले असावे. संबंधित मृत महिला डॉक्टरने यापूर्वीच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देऊन माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन’ असा स्पष्ट इशारा दिला होता.

वरिष्ठांकडे तक्रार करूनही दाद न मिळाल्याने, अखेर त्यांनी काल रात्री हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासानुसार ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या मृत डॉक्टर तरुणीच्या तळहातावर तिच्या आत्महत्येमागील कारण लिहून ठेवलेले आढळले आहे. त्यामध्ये फलटण येथेच कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकासह आणखी एका व्यक्तीस या आत्महत्येस जबाबदार धरण्यात आल्याचा तपशील आहे. संबंधित पोलिस अधिकाऱ्याने अत्याचार केल्याची तसेच अन्य व्यक्तीने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार या तपशीलामध्ये केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी फलटण येथे दाखल झाले आहेत. त्यांनी संबंधित संशयित उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे. गुन्हा दाखल झालेला हा उपनिरीक्षक आणि अन्य एक व्यक्ती सध्या फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना केल्याची माहिती दोशी यांनी दिली. हे सर्व प्रकरण काल रात्री घडले असून ते आज सकाळी उघडकीस आल्यानंतरही खूपच उशिराने आज दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.