सातारा : गणेशोत्सवात सर्वत्र गरजणाऱ्या ‘आवाजाच्या भिंती’च्या (डॉल्बी) विरोधात सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिक आक्रमक झाले आहेत. या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या भयंकर ‘आवाजाच्या भिंती’ (डॉल्बी) नकोच यासाठी प्रशासनाला निवेदन दिले आहे. समर्थ ज्येष्ठ नागरिक संस्था, तसेच शहरातील इतर काही ज्येष्ठ नागरिक संघांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने जरी मर्यादित स्वरूपात या डॉल्बीला परवानगी दिली, तरी त्याचा निषेध करण्याचा तसेच त्याविरुद्ध वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशाराही या ज्येष्ठ नागरिकांनी दिला आहे.
शाहू कला मंदिरमध्ये गणेशोत्सव समन्वय समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत ‘आवाजाच्या भिंती’चा आवाज पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले नाहीत. काही ग्रामपंचायतींनी स्वयंस्फूर्त निर्णय घेतला आहे. मात्र, सातारा शहरात डॉल्बी वाजवणे आणि त्याच्यावर आवाजाची मर्यादा घालणे असा जिल्हा प्रशासनाने सूर पकडला आहे. हल्ली वाढदिवस अथवा अन्य कारणाने शहरात मोठ्या आवाजात फटाके फोडले जातात. लाउडस्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी लावली जातात. त्यामुळे शांततेला तडा जातो. कानठळ्या बसून ज्येष्ठ नागरिकांची प्रकृती बिघडते अशा आवाज निर्मितीला शासनाने कठोरतेने पायबंद घालावा अशी मागणी या ज्येष्ठ नागरिकांमधून गेले अनेक दिवस होत होती.
याच पार्श्वभूमीवर समर्थ परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष विजय देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. गणेशोत्सवांमध्ये डॉल्बीचा अमर्याद वापर केला जातो. जिल्हाधिकारी संतोष पाटील व पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे.
समर्थ ज्येष्ठ नागरिक संस्था, तसेच शहरातील इतर काही ज्येष्ठ नागरिक संघांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने जरी मर्यादित स्वरूपात या डॉल्बीला परवानगी दिली, तरी त्याचा निषेध करण्याचा तसेच त्याविरुद्ध वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा, ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने सातारा शहरातून निषेध रॅली काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.