मराठवाडय़ातील ध्येयवादी पत्रकारितेची कावड प्रदीर्घ काळ आपल्या खांद्यावर पेलणारे ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक सुधाकर विनायक डोईफोडे (वय ७७) यांचे बुधवारी हैदराबाद येथे खासगी रुग्णालयात निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी मालतीताई, दोन मुले, सुना, ५ भाऊ, बहीण, नाती, नातू असा मोठा परिवार आहे. डोईफोडे यांनी मरणोत्तर नेत्रदान केले. हैदराबाद येथील ग्लोबल रुग्णालयात त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यात आली. डोईफोडे यांचे पार्थिव हैदराबादहून येथे आणण्यात आले. उद्या (गुरुवारी) सकाळी साडेदहा वाजता अंत्यसंस्कार होतील. निधनाचे वृत्त येताच असंख्य चाहत्यांनी भाग्यनगरातील डोईफोडे यांच्या निवासस्थानी धाव घेतली. सुधाकरराव गेले काही आठवडे यकृताच्या विकाराने त्रस्त होते. स्थानिक डॉक्टरांनी उपचार केल्यावर त्यांना गेल्या आठवडय़ात हैदराबादला तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार घेण्यासाठी नेण्यात आले. बुधवारी त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास थांबला.
पत्रकारिता, समाजकारण व राजकारणातून डोईफोडे यांचा मराठवाडय़ात सर्वदूर दबदबा होता. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर वकिली पेशाकडे पाठ फिरवून डोईफोडे निश्चयपूर्वक पत्रकारितेत आले. ‘प्रजावाणी’ साप्ताहिक १९६२ मध्ये सुरू करून डोईफोडे त्याचे संपादक झाले. वयाच्या अकराव्या वर्षी ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात निजामविरोधी मोर्चात सहभागी झाले. स्वातंत्र्योत्तर काळात आणीबाणीला त्यांनी विरोध केला. १९६७ मध्ये व्यंकटराव तरोडेकर यांचा त्यांनी पालिका निवडणुकीत पराभव केला. समाजवादी विचारांनी त्यांनी राजकारण केले. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या स्थापनेनंतर रेल्वेविषयक प्रश्नांचा सखोल अभ्यास करून मराठवाडय़ाचे रेल्वेचे प्रश्न वेगवेगळ्या व्यासपीठावर मांडून जनजागृती केली.
नांदेडच्या समाजजीवनावर दीर्घकाळ ठसा उमटविणाऱ्या सुधाकाररावांना स्थानिक, विभागीय तसेच राज्य पातळीवरील अनेक मान-सन्मान मिळाले. पहिला नांदेड भूषण पुरस्कार त्यांना मिळाला. मराठवाडा विद्यापीठाने अलीकडेच जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानीत केले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, मंत्री डी. पी. सावंत, खासदार भास्करराव खतगावकर, प्रा. दत्ता भगत, प्रा. तु. शं. कुळकर्णी, प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी डोईफोडे यांना श्रद्धांजली वाहिली.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jan 2014 रोजी प्रकाशित
ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक सुधाकर डोईफोडे यांचे निधन
मराठवाडय़ातील ध्येयवादी पत्रकारितेची कावड प्रदीर्घ काळ आपल्या खांद्यावर पेलणारे ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक सुधाकर विनायक डोईफोडे (वय ७७) यांचे बुधवारी हैदराबाद येथे खासगी रुग्णालयात निधन झाले.
First published on: 23-01-2014 at 01:39 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior journalist veteran freedom fighter sudhakarrao vinyakrao doiphode passes