नांदेड : नागपूर-गोवा शक्तिपीठ शिघ्रसंचार द्रूतगती महामार्गासाठी अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथे पोलीस बंदोबस्तात होणारी सीमांकन कार्यवाही नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी एकजुटीने हाणून पाडली.मंडळ अधिकारी श्रीमती जे.पी.कोल्हे,ग्राममहसुल अधिकारी श्यू.यू. वानखेडे,मोनार्च कंपनीचे प्रकल्प अभियंता सुनील देशमुख, मोनार्चच्या संघटक श्रीमती चंद्रभागा शिंदे व पोलीस जमादार बी.डी. चाटे यांच्या पथकाने भोगाव येथे सीमांकनाचा केलेला प्रयत्न भोगाव येथील बाधित शेतकर्‍यांनी हाणून पाडला.यावेळी नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील शक्तिपीठ बाधित शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थितती होती.

अर्धापूर तालुक्यातील सुपीक व बागायती जमिनीमधून जाणार्‍या शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकर्‍यांचे जीवन उध्वस्त होणार आहे.अल्पभूधारक शेतकर्‍यांची या परिसरात लक्षणीय संख्या असल्यामुळे त्यांना शेतीशिवाय उदरनिर्वाहाचे दुसरे कुठलेही साधन नाही.विविध मार्गाने शेतकर्‍यांनी शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून देऊनही शासनाने शेतकर्‍यांच्या मागणीकडे कायम दुर्लक्ष केले आहे.शेतकर्‍यांनी सादर केलेले आक्षेप अर्जही शासनाने अन्याय्य पद्धतीने निकाली काढले आहेत.त्यामुळे रस्त्यावरच्या लढाईशिवाय दुसरा कुठलाही मार्ग शिल्लक नसल्याचे शेतकरी प्रतिनिधिंनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व बाधित शेतकर्‍यांचा या भूसंपादनास तीव्र विरोध असून आम्ही कुठल्याही परिस्थितीत या अनावश्यक महामार्गासाठी आमची जमिन देणार नाहीत असा निर्धार बाधित शेतकर्‍यांनी यावेळी व्यक्त केला. शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक सुभाष मोरलवाल,गजानन तिमेवार,सतीश कुलकर्णी,प्रमोद इंगोले,मारोती सोमवारे,कचरु मुधळ,भोगाव येथील शक्तिपीठ बाधित शेतकरी ईश्वर वलबे,निजामोद्दीन जलालोद्दीन,शेख जावेद इसुफुद्दीन,म.खाजामिया ,गणपत गव्हाणे यांच्यासह डोंगरकडा,जवळा पांचाळ,भाटेगाव,गिरगाव,बाभुळगाव,सुकळी वीर,जामगव्हाण,रुंज,वसफळ ई.ठिकाणचे बाधित शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.