शक्तिपीठ महामार्गाचा शेवट असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरण आणि वन्यजीव संपदेला महामार्गामुळे धक्का पोहोचण्याची भीती पर्यावरणवाद्यांकडून व्यक्त होत आहे. पश्चिम घाटातील संवेदनशील क्षेत्रातून जाणारा हा पट्टा अनेक वनौषधींसाठीही ओळखला जातो. त्यावरही महामार्गाच्या कामाचा परिणाम होण्याची भीती आहे.
शक्तिपीठ महामार्गासाठी सिंधुदुर्ग जिह्याच्या दोन तालुक्यांतील ४०० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यासाठीचे सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) महामार्गाच्या अधिग्रहण क्षेत्रात एमएसआरडीसीची खूण दर्शवणारे दगड बसवण्यात येतील. मात्र हा मार्ग ज्या गावातून जाणार आहे. त्यात ‘वाइल्ड लाइफ कॉरिडोर’मधील गावांचाही समावेश आहे. यात गेळे, आंबोली, पारपोली, वेर्ले, नेने, उडेली, फणसवडे, घारपी, फुकेरी, तांबोळी, डेगवे, बांदा अशा बारा गावांतून हा महामार्ग जाणार आहे. यापैकी बहुतेक गावे ही पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर करावीत, असे उच्च न्यायालयाने दिले आहेत. या ठिकाणी सह्याद्री वाइल्ड लाइफ कॉरिडोर प्रस्तावित आहे. पट्टेरी वाघांसह अन्य वन्यप्राण्यांचा या परिसरात अधिवास आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गामुळे या परिसरातील वनसंपदेला मोठा धोका होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या ठिकाणी कमी लोकसंख्येची आणि विखुरलेली गावे आहेत. यामुळे कमीत कमी मनुष्य हस्तक्षेप असलेली जंगले या परिसरात आहेत. या भागातून इतका मोठा रस्ता गेल्यास येथील वन्यप्राण्यांचा अधिवास, त्यांचे भ्रमण मार्ग यावर गंभीर परिणाम होणार आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागणार आहे. महामार्ग गेल्यामुळे पाण्याच्या प्रवाहांमध्ये अडथळा निर्माण होण्याची भीती आहे. अनेक दुर्मीळ वनौषधी नष्ट होण्याची भीती पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत.

वन्यप्राण्यांच्या मार्गात अडसर

प्राण्यांचे भ्रमण मार्ग ठरलेले असतात. सोप्या कोकणात याला ‘गोवंड’ असे म्हणतात. पाणीस्राोत, खाण्यापिण्यासाठी जाणे, दिनचर्या यावरून प्राण्यांचे मार्ग ठरतात. त्यांच्या बुद्धीप्रमाणे सुरक्षितता लक्षात घेऊन वर्षानुवर्षे प्राणी त्याच मार्गाने जा-ये करत असतात. सह्याद्रीच्या रांगांमध्ये असणाऱ्या गावांमधील गावकऱ्यांना हे प्राण्यांचे भ्रमण मार्ग पक्के माहीत असतात. त्या मार्गात अडथळा आणायचा नाही, असे संकेत असतात. म्हणूनच या गावांमध्ये पूर्वीच्या पाणंदीच्या मार्गात घरे बांधली जात नव्हती. सहापदरी मार्ग गेल्यावर या बाराही गावांतील प्राण्यांचे हजारो भ्रमण मार्ग नष्ट होण्याची भीती आहे. अनेक ठिकाणी जंगल दोन बाजूला विभागले जाण्याची शक्यता आहे. याचा दुष्परिणाम येथे असणाऱ्या दुर्मीळ प्राणीविश्वाच्या एकूणच जीवनशैलीवर होऊ शकणार आहे. मानवी हस्तक्षेपापासून दूर राहण्याची सवय असलेल्या प्रजातींच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

वन विभागाकडे प्रस्ताव नाही

शक्तिपीठ महामार्ग सध्याच्या आराखड्यानुसार वन जमिनीतून जाण्याची शक्यता आहे. वन जमिनीवर काही करायचे झाल्यास परवानगी घ्यावी लागते मात्र तसा कोणताही प्रस्ताव सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक कार्यालयात आलेला नाही असे उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांनी बोलताना सांगितले. मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या आंबोली घाटरस्त्याच्या डागडुजी आणि दुरुस्तीसाठी परवानगी मागितली होती ती देण्यात आली आहे. तसेच दाणोली ते बांदा रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येत आहे. या रस्त्यावर काही ठिकाणी वन विभागाची परवानगी अपेक्षित होती, तीही देण्यात आली आहे असे उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांनी सांगितले.

महामार्गाच्या वाटेवर येणाऱ्या गाव-तालुक्यांतील शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या मतांनाही या मालिकेतून व्यासपीठ दिले जाणार आहे. तुम्हाला महामार्गाविषयी काय वाटते, तो आवश्यक वाटतो का, शेतीवर काय परिणाम होईल, धार्मिक पर्यटनासाठी तो वरदान आहे का या किंवा अशा अन्य मुद्द्यांवर तुमची मते आम्हाला loksatta@expressindia. com या ईमेलवर कळवा. निवडक, अभ्यासपूर्ण आणि जनभावना व्यक्त करणाऱ्या मतांना लवकरच प्रसिद्धी दिली जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सहापदरी महामार्गासाठी बेसुमार वृक्षतोड होणार असून, ज्यामुळे येथील जैवविविधतेचे मोठे नुकसान होईल. एवढ्या मोठ्या वृक्षतोडीमुळे आज हत्ती, गवे, माकडे, सांबर यांचे अधिवास धोक्यात येणार असून, ते आसपासच्या गावांमध्ये शिरण्याची भीती आहे. आधीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दक्षिणेकडील गावांना हत्ती आणि वानरे आणि रानगव्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महामार्गामार्गामुळे हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता आहे.– डॉ. जयेंद्र परुळेकर, पर्यावरण अभ्यासक