अजित पवारांनी अचानक भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. त्यानंतर या घटनेवर बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. राऊत यांच्यानंतर शालिनीताई पाटील यांनीही  अजित पवारांच्या निर्णयावरून शरद पवारांना भूतकाळातील घटनेची आठवण करून दिली. खंजीर खुपसणं म्हणजे काय हे शरद पवारांना आज कळाल असेल, असं त्या म्हणाल्या. पण, पवारांनी असं काय केलं होत की त्यांनी हे विधान केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर ही घटना आहे, १९७८मधील. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीचे निकाल त्रिशंकू लागले. आणिबाणीनंतर झालेल्या या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसबरोबरच रेड्डी काँग्रेसलाही फटका बसला. तर निवडणूक निकालात जनता पक्षाला सर्वाधिक ९९ जागा मिळाल्या. दुसरीकडं इंदिरा काँग्रेसला ६२, तर रेड्डी काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला १३, माकपला ९, आणि अपक्षांना ३६ जागा मिळाल्या होत्या. स्पष्ट बहुमत कुणालाही नव्हतं. मात्र, जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. जनता पक्षाला रोखण्यासाठी इंदिरा कांग्रेस आणि रेड्डी काँग्रेस यांनी आघाडी केली आणि मार्च १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर इंदिरा काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते नासिकराव तिरपुडे यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

सरकार सत्तेवर आले. नासिकराव तिरपुडे यांनीही वर्चस्व गाजवायला सुरूवात केली. याकाळात त्यांनी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यावर टीका केली, असं म्हटलं जातं. पण, हे सगळं सुरू असताना शरद पवार अचानक ४० आमदारांना घेऊन सरकारमधून बाहेर पडले आणि त्यानंतर अल्पमतात आलेल्या वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

पुढे बाहेर पडलेल्या शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर शरद पवारांनी जनता पक्षाशी हातमिळवणी करून ‘पुलोद’ (पुरोगामी लोकशाही दल) चा राजकीय प्रयोग केला. यात समाजवादी काँग्रेस आणि जनता पक्षाबरोबर शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते. केवळ ४० आमदारांचं संख्याबळ असताना ‘पुलोद’च्या माध्यमातून शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अवघ्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्रीपद सांभाळणारे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. पण, या घटनेनंतर शरद पवारांवर त्यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप करण्यात आला. तो शिक्का कायमचा शरद पवारांवर बसला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shalinitai patil why reply to sharad pawar over ajit pawar decision bmh
First published on: 25-11-2019 at 12:19 IST