सांगली : पर्यटन वाढीसाठी चांदोली अभयारण्याबरोबरच सांगलीचा कृष्णाकाठ, दंडोबा परिसराचा विकास करण्यासाठी प्राधान्याने विचार करण्याचे आडासन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. यासाठी शासनाकडून तातडीची बैठकही बोलावण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी तासगाव येथे मंत्री देसाई यांची भेट घेऊन जिल्ह्याच्या पर्यटन विकासाबाबत मुद्दे सांगत स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी पर्यटनस्थळांचा विकास करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यासाठी त्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासोबत चांदोली पर्यटन विकासाची चांगली संधी असल्याचे सांगितले. तसेच वनीकरणामुळे सांगलीपासून जवळच असलेल्या दंडोबा डोंगर परिसराचाही पर्यटनासाठी महत्त्वाचे क्षेत्र ठरू शकते, असेही सांगितले. सांगलीला कृष्णेचा नैसर्गिक किनारा लाभला असून, याचाही पर्यटनाच्या अंगाने विकास झाला तर निश्चितपणे स्थानिक लोकांना रोजगार संधी निर्माण होऊ शकतात, असेही श्री. पाटील यांनी मंत्री देसाई यांच्या नजरेस आणून दिले.
आमदार सत्यजीत देशमुख यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या चांदोली पर्यटन विकासाच्या प्रस्तावाला ताकद दिल्यास जिल्हा राज्य व देशाच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे येईल. त्याच्या बरोबरीने सांगलीतील श्री गणपती मंदिराच्या निमित्ताने धार्मिक पर्यटन, कृष्णा नदीवर साहसी जलक्रीडा व्यवस्था निर्माण करणे, साबरमती नदीच्या धर्तीवर दोन्ही काठांचा विकास करणे, कृष्णामाई महोत्सव; संगीत नगरी मिरजेत तंतुवाद्य निर्मितीचे पर्यटनाच्या दृष्टीने ब्रँडिंग, दंडोबा डोंगर विकासाचा सुनियोजित आराखडा बनवणे आदी मुद्यांकडे त्यांनी लक्ष वेधले.
जिल्ह्यात पाहण्यासारखी स्थळे खूप आहेत, मात्र, पर्यटनाच्या दृष्टीने विकास झालेला नसल्याने पर्यटकांना येथील पर्यटन स्थळांची माहिती मिळत नाही. यासाठी नियोजन बध्द पर्यटन विकास केला तर त्याचा निश्चित फायदा पर्यटकाबरोबरच स्थानिक लोकांनाही होईल असे श्री. पाटील यांनी मंत्री देसाई यांना सांगितले.
श्री. देसाई म्हणाले, महाराष्ट्रातील पर्यटनाला वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. सांगलीत जिथे संधी असेल तेथे आपण पर्यटन विकासाला चालना देऊ. त्यासाठी पर्यटन मंत्रालय संपूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.