इंदापूर : सध्याचे देशातील सरकार विरोधकांना तुरुंगात टाकून दडपशाही करत आहे. शेतमालाला रास्त हमीभाव मिळण्याच्या मागणीसाठी पंजाब, हरियाणा येथील हजारो शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलनाचे हत्यार उपासले आहे. परंतु हे सरकार त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाही, अशी विदारक स्थिती देशामध्ये निर्माण झाल्याचा आरोप करून सत्ताधारी पक्षाची दडपशाही मोडून काढा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केले.

बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, संजय जगताप, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पत्नीने पतीच्या गुप्तांगावर केले वार; बार्शीतील धक्कादायक प्रकार

पवार म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांना संपूर्ण देशामध्ये एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाहिले जाते. अशा केजरीवाल यांना देशाच्या पंतप्रधानांवर टीका केली म्हणून, त्याचबरोबर झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनाही या सरकारने तुरुंगात डांबले आहे. असाच प्रयोग खासदार संजय राऊत, अनिल देशमुख यांच्यावरही झाला. अशा घटनांत वाढ होत असतानाच निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस पक्षाचे खाते गोठवण्याचे काम या सरकारने केले आहे. आगामी काळात सर्वसामान्यांचीही बँक खाती हे सरकार बंद करण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कर्नाटकमधील एक खासदार भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य माणसांना जो अधिकार दिला त्या राज्यघटनेवरच आता ही मंडळी हल्ला करत आहेत. म्हणून आता जागरूक होण्याची वेळ आलेली आहे. देशामध्ये एक वेगळी स्थिती निर्माण झाली आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर या सत्तारूढ पक्षाला या निवडणुकीत बाहेर काढा, असे आवाहन त्यांनी केले. 

 थोरात म्हणाले की, ही निवडणूक राज्यघटना, लोकशाही वाचविण्यासाठी आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून सध्या महाराष्ट्रात व देशात चाललेला दहशतवाद मोडून टाका. सुळे म्हणाल्या की, यापूर्वीच्या तीन निवडणुकांमध्ये गाडय़ा अडवून दमदाटी करण्याचे उद्योग कधी झाले नाहीत. दडपशाहीचे राजकारण करत असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत ‘करेक्ट कार्यक्रम’ करू.