कोल्हापूर : कोणत्याही प्रकल्पाला असणारा विरोध हिताचा आहे का, हे बघायला हवे. शक्तिपीठ प्रकल्पाला असणाऱ्या विरोधाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली आहे. या प्रकल्पाबाबत दोन्ही बाजू समजावून घ्यायला हव्यात. शासनाचीही बाजू ऐकायला हवी, असे मत राष्ट्रवादीचे नेते, खासदार शरद पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यावर पवार यांनी, राजकारणात मतभेद विसरून एकत्र येऊन चांगले काम करणे कधीही चांगलेच! त्यामुळे सगळे मतभेद विसरून आम्ही एकत्र येत असू, तर ते चांगलेच आहे, असे मत व्यक्त केले.
भाजपकडून २५ जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावर पवार म्हणाले, ‘आणीबाणी लागू करणाऱ्या इंदिरा गांधींनी जनमत लक्षात घेऊन नंतर देशाची माफी मागितली होती. तेव्हा जनता पक्षाचे सरकार होते. पुढे जनतेने पुन्हा इंदिरा गांधींच्या हातीच सत्ता दिली, हे जनमत भाजपच्या नेत्यांनी लक्षात घ्यावे.’
केंद्र सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीवर पवार म्हणाले, ‘विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांना फक्त एक वर्ष पूर्ण झाले आहे. मंत्रिमंडळाने घेतलेले सर्व निर्णय मीच घेतलेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. त्यांची ही विधाने अस्वस्थ करणारी आहेत. निर्णय घेतले नसताना ते श्रेय घेतात.’ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सीमाप्रश्नाच्या समितीत असलेले जयंत पाटील यांच्यावर अधिक जबाबदारी टाकावी अशा भावना व्यक्त केल्या आहेत. या प्रश्नावर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचेही पवार म्हणाले.
‘इस्रायल व इराणबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी, जे निर्णय झाले ते मी घेतले, अशी घोषणा केली. कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नसताना ते सगळे श्रेय स्वत: घेतात. कोणाशी बोलतात ते कळत नाही. त्यामुळे त्यांची विधाने अस्वस्थ करणारी आहेत. युरोपातही अनेक देशांमध्ये ट्रम्प यांच्या वर्तनाबाबत नाराजी आहे. सौदी अरेबिया, कतार, अफगाणिस्तान, इराण या भागात अमेरिकेच्या भूमिकेबाबत नाराजी आहे.
आपण शक्तिशाली आहोत म्हणून छोट्या देशांवर आपले मत लादणे योग्य नाही. त्यामुळे भारताने यात स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, असे पवार म्हणाले. पहिली ते चौथी या प्राथमिक इयत्तांसाठी हिंदी सक्ती योग्य नाही. सरकारने तिथे हिंदीचा हट्ट करू नये; पण पाचवीपासून हिंदी भाषा येणे, हे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे,’ असे मत पवार यांनी व्यक्त केले. या वेळी व्ही. बी. पाटील, समरजितसिंह घाटगे उपस्थित होते.