Sharad Pawar NCP Leader tested Covid-19 positive : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना करोनाची लागण झाली आहे. पवार यांनी ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी घेण्याचं आणि चाचणी करून घेण्याचं आवाहनही केलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये शरद पवार म्हणतात, माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी.

शरद पवार ८१ वर्षांचे असून त्यांनी करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातले अनेक मंत्री आणि विविध पक्षांतले अनेक प्रमुख नेते करोनाबाधित आढळले होते. यात पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील अशा अनेकांचा समावेश आहे. यातले काहीजण करोनामुक्त झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नजर टाकूयात राज्यातल्या करोना आकडेवारीवर….

राज्यात काल दिवसभरात करोनाचे ४०,८०५ नवीन रुग्ण आढळले. तर २७,३७७ रुग्ण करोनामुक्त झाले. राज्यातल्या आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या नागरिकांची एकंदर संख्या ७०,६७,९५५ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा राज्याचा दर ९४.१५ टक्के आहे. सध्या राज्यात करोनाचे २ लाख ९३ हजार ३०५ रुग्ण उपचार घेत आहेत. करोनामुळे राज्यात काल ४४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्याचा करोनाचा मृत्युदर १.८९ टक्के आहे. राज्यात काल एकाही नव्या ओमायक्रॉन बाधिताची नोंद झाली नाही. आत्तापर्यंत राज्यात ओमायक्रॉनचे २,४७५९ रुग्ण आढळून आले आहेत.