Raj Thackeray And Uddhav Thackeray: प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची नुकतीच एक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंना, ते आणि उद्धव ठाकरे राजकीय एकत्र येणार का? या स्वरूपाचा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र आणि मराठीच्या मुद्द्यावर ते एकत्र येण्यास तयार आहेत, पण यासाठी त्यांचीही इच्छा असायला हवी.

दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचा चर्चा सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, “२०१४ मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसनेनेची युती तुटली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी संपर्क केला, दोघे बोलले आणि एकत्र लढायचे ठरले. यावर आमच्याकडून बाळा नांदगावकर आणि शिवसेनेकडून अनिल देसाई चर्चा करतील असे ठरले होते. त्याच्यासाठी राज ठाकरे यांनी एबी फॉर्म थांबवून ठेवले होते.

शिवसेनेने दोन वेळा धोका दिला

संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, “हे ठरल्यानंतर दोन दिवस उद्धव ठाकरे आणि अनिल देसाई यांनी फोन उचलले नाही. अनिल देसाईंनी त्यांचे एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली तरीही मनसेने एबी फॉर्म थांबवून ठेवले होते. हे सांगायचा उद्देश असा की, आम्हाला शिवसेनेने २०१४ आणि २०१७ (मुंबई महापालिका निवडणूक) असा दोन वेळा धोका दिला.”

ठाकरे गटाची प्रतिक्रिया

दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेवर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनीही मोठी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “राज ठाकरे याक्षणी आम्हाला भाजपा आणि एसएनशी (शिंदे गट) यांच्याबरोबर दिसत आहेत. आमच्या दृष्टीने ते महाराष्ट्राच्या हिताचे काम करत नाहीत. ते राज ठाकरे यांचा वापर करून राज्यातील मराठी माणसाला पडद्यामागून त्रास द्यायचे कारस्थान रचत आहेत. हे राज ठाकरे यांच्या लक्षात आले असेल, तर हे मराठी माणसावर उपकार होतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकत्र येण्याचे वक्तव्य केल्यानंतर याबाबत राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत आहेत.