सावंतवाडी : नगरपालिका व नगरपंचायती निवडणुकांसाठी राज्यात महायुती व महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीसाठी नवे समीकरण जुळून येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील भाजपचे आणि त्यातही राणे कुटुंबाचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी आता शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येत आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला असून, लवकरच त्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी. प्रत्येक निवडणुकीत या दोन्ही पक्षांचे नेते, कार्यकर्ते एकमेकांची कुरघोडी काढतात. मात्र कणकवली नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवण्यासाठी या दोनही पक्षांनी पडद्यामागे हालचाली सुरू केल्या आहेत. राणे कुटुंब आणि भाजपला आव्हान देण्यासाठी दोनही गट एकत्र येऊन ‘शहर विकास आघाडी’ स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर, वकील आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी शहरातील सर्वांगीण विकासासाठी एकत्रित येऊन नगरपंचायत निवडणूक लढवण्याचा ‘शहर विकास आघाडी’चा प्रस्ताव ठेवला आहे. शहरात या संदर्भात एक गुप्त बैठक झाली असून या बैठकीत माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, स्थानिक नेते सुशांत नाईक, संदेश पारकर आणि सतीश सांवत आदी नेते उपस्थित होते. शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच हे दोन्ही गट स्थानिक स्तरावर मतभेद विसरून एकत्र येण्याची तयारी दर्शवत असल्याची चर्चा आहे. या आघाडीतर्फे संदेश पारकर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या युतीबाबतचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आला असून, या ‘शहर विकास आघाडी’वर वरिष्ठ नेतेच अंतिम निर्णय घेणार आहे.
माजी आमदार वैभव नाईक आणि जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिकांकडून यासंदर्भातील प्रस्ताव आला आहे. हा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आला आहे. अंतिम निर्णय पक्षपातळीवरच होईल. – राजन तेली, माजी आमदार (शिंदे गट)
