वाई : शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी जिहे-कटापुर जलसिंचन उपसा योजनेचे उद्घाटन केले. जवळपास वीस वर्षे रखडलेल्या योजनेचे त्यांनी उदघाटन केले. जिहे काठापूर पाणी योजनेचे जलपूजन शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी अचानक केले. ही योजना पंतप्रधान मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना आमच्या भागासाठी फलदायी असून आता सरकारने दुष्काळी योजनांसाठी विजेचे दर कमी करावेत, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
सातारा जिल्ह्यातील खटाव या दुष्काळी भागासाठी महत्वपूर्ण असणारी जिहे-कटापुर या योजनेचे काम गेल्या सव्वीस वर्षांपासून धिम्यागतीने काम सुरू होते. अखेर आज नेर तलावात पाणी आल्याने शेतकरी वर्गात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. या योजनेचा फायदा खटाव तालुक्यातील दुष्काळी भागाला मोठ्या प्रमात होणार असल्याने या भागातील शेतकरी या योजनेकडे डोळे लावून बसले होते.




मागील सव्वीस वर्षापासून हा प्रकल्प धिम्या गतीने सुरू होता. राज्यांमध्ये सर्वत्र अतिवृष्टी होत असतानाही आमच्याकडे दुष्काळ आणि टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिहे कटापूर योजनेचा सोलार योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात सोलर वीज निर्मिती होणार आहे. सातारा जिल्ह्यात जलसंपदामंत्रीपद दहा वर्षे असतानासुद्धा योजना अजिबात पुढे सरकली नव्हती. देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री असताना त्यांनी या परिसराला भेट दिली होती. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुरु लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावाने सुरू करण्यात आली होती. पाठपुराव्यासाठी लक्ष्मणराव इनामदार ट्रस्ट स्थापन करण्यात आला होता. या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय जल आयोगाची मान्यता दिल्याने त्यातून निधी ही योजना पूर्णत्वास जात आहे.
– आमदार महेश शिंदे, कोरेगाव