Sanjay Raut On Saif Ali Khan recovery: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या घरात चोरट्याने चाकूहल्ला केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या हल्ल्यानंतर सैफ अली खान याच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तब्बल पाच दिवस उपचार घेतल्यानंतर तो काल (२१ जानेवारी) आपल्या घरी परतला. दरम्यान रुग्णालयातून परतताना तो गाडीतून उतरून चालत आपल्या इमारतीमध्ये जातानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी सैफच्या फीटनेसबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यानंतर आता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी हल्ल्यानंतर सैफ अली खान हा अगदी स्वत:च्या पायावर चालत घरी गेला हा वैद्यकीय चमत्कार असल्याचे म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “हा वैद्यकीय चमत्कार आहे. मी त्यांच्या आरोग्यासाठी मी शुभेच्छा देईल”.

“आपल्या देशील ते (सैफ अली खान) चांगले कलाकार आहेत. मन्सूर अली खान पतौडी यांचे पुत्र आहेत, करीना कपूरचे पती, तैमुरचे वडील आहेत. चाकू कितीही आत घुसला असला तरी माणूस जिवंत आहे आणि आपल्या पायावर चालत घरी जात आहे, हा आपल्या लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेला चमत्कार आहे असं मला वाटतं”, असेही संजय राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं काय झालं होतं?

बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम (३०) हा १६ जानेवारी रोजी सैफ अली खानच्या मुंबईतील घरात शिरला. चोरी करण्याच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसखोरी केल्याची कबुली दिली. रात्री सैफच्या घरातील मदतनीस यांच्याशी झटापट झाल्यानंतर सैफ अली खान आणि मोहम्मद शरीफुल इस्लाम यांच्यातही झटापट झाली. ज्यात सैफ अली खानच्या शरीरावर सहा वार करण्यात आले. त्यानंतर पाच दिवस लिलावती रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर काल सैफ अली खान घरी परतला. त्याच्या हाताला पट्टी बांधलेली दिसत होती. यावेळी सैफला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. चाहत्यांना हात दाखवत तो आपल्या घरी गेल्याचा व्हिडीओम समोर आला आहे.

संजय निरुपम काय म्हणाले?

शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, “सैफ अली खानच्या पाठीत २.५ इंचाचा चाकू घुसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयात गेल्यावर पाठीत रुतलेला चाकू काढण्यात आला. सहा तास शस्त्रक्रिया सुरू होती. पाच दिवसांत उपचार घेऊन सैफ अली खान इतका फिट कसा?”.