सुमार कामगिरी आणि वादग्रस्त कार्यपध्दतीमुळे शिवसेनेच्या पाच मंत्र्यांबाबत भाजप श्रेष्ठींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नाराजी ओढवलेल्या मंत्र्यांमध्ये सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांचाही समावेश असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

प्रा. तानाजी सावंत हे शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातील परांडा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले तरी त्यांची सोलापूर जिल्ह्याशी असलेली नाळ कायम आहे. याच जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील वाकाव गावचे मूळ राहणारे प्रा. तानाजी सावंत व त्यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांचे राजकीय कार्य याच भागातून वाढत गेले आहे. विशेषतः प्रा. शिवाजी सावंत यांनी यापूर्वी माढा विधानसभा निवडणूक लढविली आहे. जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व करताना उपाध्यक्षपदही सांभाळले होते. सावंत बंधुंनी अलिकडे साखर उद्योग सुरू करताना विहाळ, आलेगाव, लवंगी आदी ठिकाणी भैरवनाथ साखर कारखान्याच्या शाखा उभारल्या आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेत सावंत बंधुंचा दबदबा वाढला आहे.

हेही वाचा >>> “इतके लोकप्रिय आहात तर मग…”, अजित पवारांची एकनाथ शिंदेंवर तुफान टोलेबाजी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्कालीन उध्दव ठाकरे सरकारमध्ये मंत्री असताना प्रा. तानाजी सावंत यांच्याकडेच जिल्ह्यातील शिवसेनेची सूत्रे होती. सहपालकमंत्री आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुखपदही त्यांच्याकडेच होते. सध्या एकनाथ शिंदेप्रणीत शिवसेनेतही प्रा. तानाजी सावंत व त्यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांचा दबादबा पुन्हा वाढला आहे. पक्षसंघटना वाढविण्याच्या हेतूने प्रा. तानाजी सावंत यांनी करमाळा तालुक्यातील बंद पडलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ॲग्रो कंपनीच्या ताब्यात जाण्यापासून रोखला आणि स्वतः सुमारे १२ कोटी रूपयांची गुंतवणूक करून हा कारखाना मूळ सभासद शेतक-यांच्याच ताब्यात ठेवला आहे. हा कारखाना पुन्हा सुरू करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करमाळ्यात आणले होते. सध्या या साखर कारखान्यावर शिवसेनेचे माढा विभागाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे व संजय गुटाळ या दोघांची प्रशासकीय संचालक म्हणून वर्णी लावली आहे. प्रा. सावंत यांनी हे सर्व मंत्रिपदाच्या ताकदीवर करून दाखविले आहे. परंतु आता याच प्रा. सावंत यांचे मंत्रिपद अडचणीत आल्यामुळे स्थानिक शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. माढा विभाग जिल्हाप्रमुख महैश चिवटे यांनी प्रा. तानाजी सावंत यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक बदनामीच्या अफवा पसरविल्या जात असल्याचा आरोप केला आहे. सोलापूर जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनीही प्रा. सावंत यांचे नेतृत्वाला बदनाम करणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करताना संपूर्ण जिल्हा प्रा. सावंत यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा दावा केला आहे.