रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रचारपत्रकावर शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर कै. आनंद दिघे यांची छायाचित्रे वगळल्याने येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी महायुतीचा प्रचार काही काळ थांबवला. ही छायाचित्रे असलेली प्रचारपत्रकेच वाटली जातील, असा पवित्रा या कार्यकर्त्यांनी घेतला. त्यामुळे नव्यानेच सुरू झालेल्या महायुतीच्या प्रचारामध्ये माशी शिंकली. त्यामुळे या दोन नेत्यांची छायाचित्र असलेली प्रचारपत्रके तातडीने छापून घेण्यात आली. त्यानंतर पुन्हा वाटप सुरू झाले.
हेही वाचा >>> मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल
या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे किरण सामंत दावेदार होते पण त्यांच्या ऐवजी भाजपचे केंद्रीय मंत्री राणे यांना उमेदवारी देण्यात आली. राणे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत भाजप नेत्यांनी घेतलेल्या बैठकीत ही नाराजी दूर करून संयुक्तपणे प्रचार करण्याचा निर्णय झाला. पक्षादेश मान्य करून शिवसैनिकांनी प्रचाराला सुरुवातही केली. परंतु त्यासाठी छापून आलेल्या पत्रकावर कै. ठाकरे आणि कै. दिघे यांची छायाचित्रे नसल्याने त्यांनी प्रचार करणे थांबवले. हा प्रकार कानावर येताच भाजपच्या नेत्यांनी धावपळ करून या दोन नेत्यांची छायाचित्रे छापलेली प्रचार पत्रके शिवसैनिकांच्या हाती सोपवली . त्यानंतर प्रचाराचे काम पुन्हा सुरळीतपणे सुरू झाले आहे. दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी या संदर्भात सांगितले की, प्रचारपत्रकावर दिवंगत व्यक्तींची छायाचित्रे न छापण्याचा धोरणात्मक निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यामुळे कै. अटलबिहारी वाजपेयी, दीनदयाळ उपाध्याय यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचीही छायाचित्रे छापली नव्हती. याबाबत शिवसेनेचे उपनेते पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून गैरमज दूर झाले आहेत.