‘वणवा पेटला रं…चाकणचं आंदोलन होणार फळीफोड’ या आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्याच्या करोनाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी अशा कोणत्याही कार्यक्रमासाठी एकत्र येणं किंवा गर्दी करण्यावर बंदी असताना ही पोस्ट व्हायरल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे स्वत: सहभागी होणार असल्याचं देखील नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यभरातील बैलगाडा मालकांमध्ये या पोस्टची चर्चा सुरू झाली आहे. याविषयी खुद्द शिवाजीराव आढळराव पाटील यांनीच आता स्पष्टीकरण दिलं आहे.
काय आहे पोस्टमध्ये?
सोशल मीजियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टचा फोटो शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या फेसबुकवर शेअर केला आहे. त्यामध्ये “वणवा पेटला रं…चाकणचं आंदोलन होणार फळीफोड. खासदार आढळराव पाटलांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून गाडामालकांचे, संघटनांचे फोन, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडा मालक रस्त्यावर उतरणार. हिंगोली, यवतमाळ, वाशिममधून प्रसिद्ध गाडामालक पांडुरंग कुंडकर यांच्यासह ७०० गाडा मालक सहभागी होणार”, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच औरंगाबाद, नगर, अलिबाग, आकलुज, सातारा, सांगली, माळशिरज, कोल्हापूर या ठिकाणहून देखील मोठ्या प्रमाणावर बैलगाडा मालक येणार असल्याचं देखील पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
आढळराव पाटलांची फेसबुक पोस्ट
दरम्यान, ही पोस्ट व्हायरल होऊ लागल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. यामध्ये या व्हायरल पोस्टविषयी त्यांनी खुलासा केला आहे. यात आढळराव पाटील म्हणतात, “‘वणवा पेटला रं….चाकणचं आंदोलन होणार फळीफोड’ या नावाने बैलगाडा बंदी विरोधात आंदोलनाची पोस्ट सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असून ही पोस्ट २८ ऑक्टोबर २०१७ रोजी चाकण येथे आयोजित बैलगाडा बंदी विरोधातील लढ्यावेळी प्रसारित करण्यात आली होती. मात्र कुणीतरी जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने सध्या ही पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल करीत असून असे कोणतेही आंदोलन सद्यस्थितीत आयोजित करण्यात आलेले नाही”.
आढळराव पाटलांचं आवाहन
दरम्यान, आपल्या पोस्टमध्ये शिवाजीरावर आढळराव पाटलांनी लोकांना आवाहन केलं आहे. “माझ्या कार्यालयात याबाबत विचारपूस करण्यासाठी काल दिवसभरात शेकडो फोन आले होते. तरी बैलगाडा मालक व शेतकऱ्यांनी सत्यता पडताळावी व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.