सातारा : अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मराठवाडा भागात अतिवृष्टीसोबत पुरस्थितीमुळे उभी पिके नष्ट झाली आहेत. बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार ठोस पावले उचलत आहे. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाणार असल्याचे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि अजिंक्यतारा साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
शेंद्रे (ता. सातारा) येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात झाली. या सभेत शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, सर्व आजी, माजी संचालक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती सतीश चव्हाण, वनिता गोरे, सातारा जिल्हा बँकेच्या संचालक कांचन साळुंखे, सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कमी क्षेत्रात उच्चांकी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा रोख रक्कम, स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
राज्यावर आलेले अतिवृष्टीचे संकट मोठे असल्याचे सांगून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार यासाठी ठोस पावले उचलत आहे. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळदेखील यासाठी सक्रिय आहे. सातारा जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. मी पालकमंत्री असलेल्या लातूर जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २४४ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे.
दरम्यान शेतकरी हित जोपासण्यात ‘अजिंक्यतारा’ कायम अग्रेसर राहत अशल्याचे सांगत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की बचत, काटकसर आणि नेटके नियोजन याद्वारे अजिंक्यतारा साखर कारखाना प्रगतीपथावर पोहचला आहे. संस्थेची प्रगती आणि सभासद- शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती हे अभयसिंह महाराजांचे स्वप्न साध्य झाले. गेल्या हंगामात ऊसाला ३२०० रुपये प्रतिटन भाव दिला असून या दिवाळीपूर्वी कारखाना व्यवस्थापन प्रतिटन आणखी १०० रुपये शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असल्याचे तसेच कामगारांना १९ टक्के बोनस देणार असल्याचे जाहीर करून शेतकरी हित जोपासण्यात अजिंक्यतारा कारखाना कायम अग्रेसर राहील, असे प्रतिपादन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
दरम्यान यावेळी कारखान्याच्या वतीने अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाख रुपये मदतीचा धनादेश कारखान्याच्या अध्यक्षांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. कार्यकारी संचालक मोहिते यांनी सभेपुढील विषयांचे वाचन केले. सभासदांनी हात वर करून एकमताने सर्व विषयांना मंजुरी दिली.
उपाध्यक्ष सावंत यांनी सूत्रसंचालन केले. माजी उपाध्यक्ष विश्वास शेडगे यांनी आभार मानले. सभेला किरण साबळे- पाटील, सरिता इंदलकर, राहुल शिंदे, जितेंद्र सावंत, दादा शेळके, यांच्यासह विविध संस्थांचे आजी- माजी पदाधिकारी, सभासद- शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १० लाखाची मदत
अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून अजिंक्यतारा कारखान्याने १० लाख रुपये मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली असून त्याचा धनादेश कारखान्याच्या संचालक मंडळाने मार्गदर्शक संचालक शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे सुपूर्त केला. या मदतीबद्दल सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात कारखाना व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.